चंदगड/प्रतिनिधी : कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने शनिवारी, दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी शिनोळी फाटा (ता. चंदगड) येथे काळा दिन पाळून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.ही निदर्शने शिवसेना जिल्हाप्रमुख मा. सुनिल शित्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून, सकाळी ११ वाजता शिनोळी फाटा येथे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या निदर्शनांद्वारे कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवरील अन्याय, मराठी शाळांचे दुर्लक्ष, तसेच प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या भेदभावाचा तीव्र निषेध नोंदविण्यात येणार आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मराठी माणूस सीमापार असूनही भारतीय संविधानात दिलेल्या भाषिक हक्कांचा हनन होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने आणि शासनाने या प्रश्नावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.”
या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलीस ठाणे यांना कळविण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांकडे राहणार आहे. शांततेत आणि अनुशासनात हे आंदोलन पार पाडण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख सुनिल शित्रे यांनी सांगितले.या काळ्या दिनाच्या निदर्शनांमुळे पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा प्रश्न केंद्रस्थानी येणार असून, सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments