‘अथर्व-दौलत’ चा शनिवारी विस्तारीकरण व मोळी पूजन सोहळा
ज्ञानेश्वर पाटील (संपादक)-विशेष वृत्त
चंदगड : चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व-दौलत साखर कारखाना येथील विस्तारीकरणाचा आणि मोळी पूजनाचा भव्य सोहळा शनिवार (दि. २५) रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कारखान्याच्या ३२.४ मेगावॅट क्षमतेच्या पर्यावरणपूरक को-जनरेशन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ आणि नवीन गाळप हंगामासाठी मोळी पूजन कार्यक्रम या सोहळ्यात होणार आहे.या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील असतील. तर विशेष अतिथी म्हणून अशोकराव जाधव, विमल करडे व मधुकर करडे यांच्याहस्ते काटा पूजन करण्यात येणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यात येणारा हा प्रकल्प दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा को-जनरेशन प्रकल्प ठरणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक या विस्तारीकरणासाठी करण्यात येत असून, त्यामुळे ५०० स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मराठे आणि संचालक विजय पाटील यांनी सभासद, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मात्र या कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक वर्तुळात वेगळा रंग मिसळताना दिसत आहे. कारण — बंद पडलेला ‘दौलत’ कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले व दौलत च्या कोणत्याही अडी अडचणी ना सामोरे जाऊन मार्ग काढणारे ॲड. संतोष मळवीकर यांचे नाव या निमंत्रण पत्रिकेत नाही.विशेष म्हणजे,चंदगड मतदारसंघात तडीपार प्रकरणानंतर ॲड.संतोष मळवीकर यांच्यामध्ये नाराजीचा सुर पुढं येत आहे.तसेच अधिक माहिती घेतली असता मी नेहमी शेतकऱ्यांच्या, सभासदाच्या पाठीशी राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.येणारे राजकीय समीकरण पाहता त्यांचा राजकीय निर्णय गुलदत्यात आहे तसेच या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार का?” हा प्रश्न सभासद आणि तालुक्यातील नागरिकांत चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत परस्परविरोधी राहिलेले आ. शिवाजीराव पाटील आणि मानसिंग खोराटे हे दोघे एकाच मंचावर येत असल्याने या कार्यक्रमातून नवीन राजकीय समीकरणांची बीजे रोवली जाणार का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकीकडे उद्योगविस्ताराचा सोहळा असला तरी दुसरीकडे स्थानिक राजकारणात नव्या हालचालींचा संकेत देणारा हा कार्यक्रम ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. संतोष मळवीकर यांची भूमिका काय राहणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments