शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार सजवलेल्या जनावरांची मिरवणूक व “म्हैशी पळविण्याची” प्रथा
बेळगांव/प्रतिनिधी : दिवाळी पाडवा हा गवळी बांधवांसाठी आनंद, परंपरा आणि एकतेचा दिवस म्हणून ओळखला जातो. आज बेळगाव शहरात गवळी समाजाने हा दिवस पारंपरिक उत्साहात साजरा केला. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार विविध गवळी बांधवांनी आपल्या जनावरांना फुलांचे हार, रंगीत कपडे, घंटा, आणि झगमगाटी सजावट करून बेळगावच्या मुख्य रस्त्यांवरून वाजत गाजत मिरवणूक काढली.
विशेष म्हणजे, चव्हाट गल्ली या भागात पारंपरिक “म्हैशी पळविण्याची” प्रथा देखील मोठ्या उत्साहात पार पडली. या पारंपरिक खेळात शिस्त, कौशल्य आणि शौर्य यांचा संगम दिसून आला. स्थानिक नागरिकांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून परंपरेचा आनंद घेत होता.
गवळी समाजासाठी पाडवा हा केवळ सण नाही, तर शेतकरी आणि पशुपालक जीवनातील श्रमाचे पूजन व निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. दिवाळीच्या या पाडव्यादिवशी गाई-गुरांचे पूजन करून शेतकरी बांधव आपल्या उपजीविकेच्या साथीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.पारंपरिक पोशाख, ढोल-ताशांचा गजर, आणि सजवलेल्या जनावरांच्या ताफ्याने आज बेळगाव शहर उत्साहाने न्हाऊन निघाले. एकीकडे आधुनिकतेचा वेग असला तरी, अशा परंपरा ग्रामीण संस्कृतीचे आणि शेतकरी कुटुंबांच्या आनंदाचा अविभाज्य भाग असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

Post a Comment
0 Comments