Type Here to Get Search Results !

प्रा. एस. के. सावंत यांच्या प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा गौरव


चंदगड (प्रतिनिधी) : र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने अकौउंटस विभागाचे प्रमुख ज्येष्ठ प्राध्यापक एस. के. सावंत यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते, तर प्रमुख पाहुणे इंग्रजी विभागाचे ख्यातनाम प्राध्यापक प्रा. एच. के. गावडे होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले तर आभार प्रा. महादेव गावडे यांनी मानले. प्रमुख पाहुणे प्रा. एच. के. गावडे यांनी आपल्या भाषणात प्रा. सावंत यांच्या अध्यापन व प्रशासकीय कार्याचा गौरव करताना म्हटले की, प्रा. सावंत हे केवळ उत्तम शिक्षक नव्हते, तर कुशल प्रशासक, शिस्तप्रिय प्राचार्य आणि सहकाऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे अकाउंटस विभागाने उल्लेखनीय प्रगती साधली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांनी संस्थेच्या प्रशासकीय कामकाजातही अनुकरणीय योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात वेळेचे भान, जबाबदारीची जाणीव आणि संस्थेप्रती निष्ठा ही त्यांची वैशिष्ट्ये ठरली. 


अध्यक्षीय भाषणात डॉ. गोरल म्हणाले की, प्रा. सावंत यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अपार परिश्रम घेतले असून त्यांचे कार्य भावी शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल.प्रास्ताविकात प्रा. डॉ. टी. ए. कांबळे यांनी प्रा. सावंत यांच्या शैक्षणिक कार्याचा सविस्तर आढावा घेत सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अकाउंटं विषयाविषयी आवड निर्माण करून अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले. त्यांच्या अध्यापनातील प्रामाणिकता, सहकाऱ्यांशी स्नेहभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा हा सर्वांसाठी अनुकरणीय आहे.


सत्काराला उत्तर देताना प्रा. सावंत यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. त्यांनी सुरुवातीला सर्व सहकारी, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी आणि पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले — “मी या महाविद्यालयाशी तीन दशकांहून अधिक काळ जोडलेलो आहे. संस्थेने मला केवळ नोकरी दिली नाही, तर आयुष्याचे खरे धडे दिले. मी आज जे काही आहे, ते या संस्थेमुळे आणि इथल्या सहकाऱ्यांमुळे आहे. विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकाऱ्यांचे सहकार्य हेच माझे सर्वात मोठे बक्षीस आहे.”


ते पुढे म्हणाले — “शिक्षक म्हणून माझा नेहमी प्रयत्न होता की प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जावा. विषय शिकवताना मी नेहमी प्रयत्न केला की विद्यार्थ्यांना फक्त गुण नाही, तर ज्ञान मिळावे. अध्यापन म्हणजे केवळ नोकरी नव्हे, ती साधना आहे. विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकाचा खरा आनंद आहे.”


प्रा.सावंत म्हणाले — “महाविद्यालयात काम करताना मला कधीच एकटेपणा वाटला नाही. प्रत्येक सहकाऱ्याने कुटुंबीयासारखे सहकार्य दिले. या संस्थेने दिलेलं प्रेम आणि सन्मान माझ्यासाठी आत्मिक संपत्ती आहे. सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे. मी आयुष्यभर शिक्षणसेवेशी जोडलेलो राहीन.” यावेळी प्रा. व्ही. के.गावडे यांनी प्रा सावंत यांच्यामुळेच आपण घडल्याचे सांगून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. महादेव गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण सोहळा आदर, भावना आणि गौरवाने ओथंबून गेला.

Post a Comment

0 Comments