Type Here to Get Search Results !

थकीत पगार व बोनस मिळवून दिल्याबद्दल ऍड.संतोष मळवीकरांचा सत्कार


दिन दुबळ्यांच्या अवलिया-ऍड. संतोष मळवीकर 


कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री परिचरांचा चंदगडमध्ये कार्यक्रम; पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू


चंदगड/प्रतिनिधी : आरोग्य विभागातील स्त्री परिचर महिलांना सात महिन्यांचा थकीत पगार व दीपावली बोनस मिळवून दिल्याबद्दल एडवोकेट संतोष मळवीकर यांचा चंदगड येथे कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री परिचर मार्फत सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरिता कुंभार होत्या.


यावेळी कुंभार म्हणाल्या, “गेल्या बारा वर्षांपासून आम्ही आमच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहोत. अनेक आंदोलने केली, पण जिल्हा परिषदेच्या गेटबाहेरच थांबावे लागले. एड. मळवीकर यांनी योग्य वेळी भूमिका घेतल्यानेच आमचा थकीत पगार आणि बोनस मिळाला. आता दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पगार मिळणार आहे,” असे त्या म्हणाल्या.


सत्कारास उत्तर देताना एड. संतोष मळवीकर म्हणाले, “फक्त तीन हजार रुपयांवर वीस वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री परिचर महिलांना किमान वेतन कायदाही लागू नाही. ज्या पद्धतीने कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचा पगार शासनाने वाढवून १५,५०० रुपये केला, त्याच धर्तीवर स्त्री परिचरांच्याही पगारवाढीसाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


या वेळी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील स्त्री परिचरांनी आपल्या समस्या मांडल्या. वरिष्ठांकडून त्रास झाल्यास जिल्ह्यातील सर्व महिला एकजुटीने उभ्या राहतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. पगारवाढ, विमा संरक्षण, गणवेशाची तरतूद व नियमित बोनस या मागण्यांसाठी पंधरा दिवसांत जिल्हा परिषद कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचे आवाहन एड. मळवीकर यांनी केले.


या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष लता सावरतकर, कॉ. संतोष पाटील, चंदगड तालुकाध्यक्ष वंदना गुरव, वनिता पाटील, नंदा पाटील, नंदा सुतार, रसिका गवस, कविता डावरी , वर्ष खाडे यांच्यासह विविध आरोग्य केंद्रांतील स्त्री परिचर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments