चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील पोवाचीवाडी या गावात सामाजिक एकता आणि विकासाचे प्रतीक ठरलेली स्वागत कमान उभारण्यात आली असून तिचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.महाराष्ट्र राज्य सेवा उद्योग समितीचे राज्य संयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे नेते लक्ष्मण विश्राम गावडे यांच्या हस्ते या कमानीचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामस्थांच्या एकत्रित सहभागातून उभारलेली ही स्वागत कमान गावाच्या सौंदर्यात भर घालणारी तसेच सामाजिक एकतेचा संदेश देणारी ठरली आहे. कार्यक्रमस्थळी पोवाचीवाडीतील महादेव मातवडकर, मोहन पेडणेकर, रघुनाथ बेलेकर, परशुराम नारळकर, जोतिबा सुतार तसेच गावातील महिला भगिनी, तरुण कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना लक्ष्मण गावडे म्हणाले, “गावाच्या प्रगतीसाठी एकता, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्वागत कमानीसारखे उपक्रम गावाचा अभिमान वाढवतात आणि नव्या पिढीत समाजसेवेची प्रेरणा निर्माण करतात.”
गावातील तरुणांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. या कमानीच्या माध्यमातून गावाने “स्वागत संस्कृती” जपली असून सामाजिक सलोखा आणि एकत्रित प्रयत्नांनी विकास साधता येतो, हा संदेश पोवाचीवाडीने दिला आहे.या कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी लक्ष्मण गावडे यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि अशा समाजहितकारी कार्यासाठी त्यांचे मार्गदर्शन कायम लाभावे, अशी भावना व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments