Type Here to Get Search Results !

चंदगड नगरपंचायत निवडणुकीत ८४.०८% इतके विक्रमी मतदान


१७ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान; ८,३१५ मतदारांपैकी पुरुष ३५०० व महिला ३४९१अशा एकूण ६९९१ मतदाराने मतदानाचा हक्क बजावला


चंदगड – चंदगड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ८४.०८ टक्के मतदान नोंदवले. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती वाढत गेली आणि दिवसभर शांततेत व सुव्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पडली.


या निवडणुकीसाठी एकूण १७ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये ८,३१५  मतदारांपैकी पुरुष ३५०० आणि महिला ३४९१ अशा एकूण ६९९१इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान टक्केवारी 84.08 इतकी आहे. मतदान सुरळीत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली.


महिला मतदारांचा सहभाग वाढावा आणि त्यांना अतिरिक्त गोपनीयता मिळावी यासाठी मतदान केंद्र क्रमांक ३, ४, ५, ६, १०, ११, १२ आणि १३ येथे ८ विशेष बुरखाधारी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रांवर महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून चांगला प्रतिसाद दिला.


प्रभाग १ ते १७ या सर्व केंद्रांवर शाळा, अंगणवाडी आणि शासकीय इमारतींमध्ये सुस्थित मतदान व्यवस्था होती.प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई आणि पोलीस कॉन्स्टेबल अशी नियुक्ती करून प्रशासनाने भक्कम तयारी केली होती.मतदानानंतर मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी चंदगड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूमवर बंदूकधारी सुरक्षारक्षकांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरही दिवसभर पोलीस दलाचे कडक नियंत्रण राहिले.




चंदगड शहरातील मतदारांनी उत्साहाने आणि जबाबदारीने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शांत, सुव्यवस्थित मतदानाबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व मतदार आणि कर्मचारी वर्गाचे कौतुक केले आहे.आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment

0 Comments