Type Here to Get Search Results !

शेतीच्या संरक्षणासाठी सुतळी बॉम्ब खरेदीची नामुष्की.

चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना रखवालीसाठी रात्रभर पीकाच्या शिवारात मचाण घालून बसावे लागते.उसाच्या लागणी आणि खोडवे वाढू लागले आहेत. या हिरव्या चाऱ्यासाठी गवेरेडे, हत्तीसह अन्य प्राण्यांची वहिवाट वाढली असून वन्यप्राण्यांना पिटाळण्यासाठी सुतळी बॉम्ब खरेदीवरही शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.वन्यप्राण्यांनी पीकाचे नुकसान केल्यानंतर वनविभाग भरपाई देते. परंतु वन्यप्राण्यांकडून पीकाचे नुकसान होऊच नये,यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. 

शेतीच्या मध्यभागी बांधावर मचाण उभा करून तिथे रात्रभर गस्त घालावी लागते. साऊंड बॉक्स वरून विविध जंगली प्राण्यांचे आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज अर्ध्या-अर्ध्या तासाने वाजवावे लागतात. त्यामुळे वन्यप्राण्यांना पिटाळण्यासाठी जंगलाकडून मळलेल्या वाटेने शिवारात प्रवेश करण्याच्या मार्गात सुतळी बॉम्बाची व्यवस्था करावी लागते. बारा सुतळी बॉम्ब असलेल्या एका बॉक्सची १०० रूपये किंमत आहे असे रात्रीला किमान शंभर रूपये एकरी खर्च करावे लागतात. पूर्वी राजन देसाई चंदगड येथे वनक्षेत्रपाल म्हणून कार्यरत असताना ते शेतकऱ्यांना दरमहा २० हजारांची पदरमोड करून सुतळी बॉम्ब द्यायचे.

वनविभागाने हत्तीबाधीत वा अन्य वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुतळी बॉम्बांचे वितरण करावे. हतीबाधीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने सौर कुंपन, सुतळी बॉम्बसाठी रोख अनुदान,चार्जिंगच्या बॅटऱ्या आदी साहित्यांचे वाटप करावे जेणेकरून शेतकऱ्यांना पीकाचे संरक्षण करणे सोयीचे होईल.

Post a Comment

0 Comments