बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या निवेदनाची दखल
चंदगड | प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील कानूर ते भोगोली या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या संपर्क मार्गावर दुतर्फा वाढलेली जीवघेणी झाडी व धोकादायक झुडपे येत्या चार दिवसांत तातडीने हटवण्यात यावीत यासाठी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सुपूर्द केले.या निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
कानूर ते भोगोली हा मार्ग या परिसरातील मुख्य वाहतूक वाहिनी असून यावरून दररोज भोगोली, रायचीवाडी, काळगोडवाडी तसेच परिसरातील इतर गावांमधील नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. मात्र, सध्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे आणि धोकादायक झुडपे वाढली आहेत. पावसाळ्यामुळे या झुडपांची वाढ झपाट्याने झाल्याने वळणावर समोरून अचानकपणे येणारे वाहन चालकांना वेळेत दिसत नाही. यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीषण भीती निर्माण झाली आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आज उप अभियंता देसाई यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदनाची प्रत सुपूर्द केली. रस्ता सुरक्षित, स्वच्छ व सुटसुटीत करण्याची आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. या निवेदनावर बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गुंडूराव कांबळे, कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोगोलिकर, डेप्युटी सरपंच जयसिंग कांबळे, योगेश कांबळे, श्रावण कांबळे, लखन कांबळे, महेश मातवनकर, दीपक कोदाळकर, प्रमोद मातवनकर, हर्षल नार्वेकर, गजानन कांबळे, रमेश नाईक, शिवाजी नाईक यांसह अनेक ग्रामस्थांच्या व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पावसाळ्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे ही वस्तूस्थिती आहे. नागरिकांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षिततेला आमचे पहिले प्राधान्य असून, संघटनेच्या निवेदनाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे.उप अभियंता देसाई यांच्याकडून येत्या चार दिवसांत या मार्गावरील संपूर्ण धोकादायक झाडी व झुडपे हटवून रस्ता पूर्णपणे सुरक्षित आणि सुटसुटीत करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

Post a Comment
0 Comments