Type Here to Get Search Results !

खेडूत शिक्षण मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्थेचा हिरक महोत्सव दिमाखात संपन्न



'र. भा. माडखोलकर यांच्या दूरदृष्टीमुळे छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष' – ॲड. प्रा. एन. एस. पाटील


चंदगड | प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील अग्रगण्य खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्रीच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेचा हिरक महोत्सवी सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. चंदगड येथील दि. न्यू इंग्लिश स्कूलच्या गोगटे सभागृहात झालेल्या या सोहळ्यास संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, सभासद आणि मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्रीचे अध्यक्ष जी. एस. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून संस्थेचे संचालक व ऑडिटर ॲड. प्रा. एन. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक व श्री भावेश्वरी विद्यालय, नांदवडेचे मुख्याध्यापक यू. एल. पवार यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या ६० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा परिचय तज्ज्ञ संचालक श्रीनिवास पाटील यांनी करून दिला.


यावेळी संस्थेचे माजी सचिव एन. के. पाटील, अनंत सुतार तसेच विद्यमान सचिव एम. व्ही. बाणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या माजी सभासदांचा सन्मानचिन्ह व घड्याळ देऊन गौरव करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत संस्थेच्या विविध विद्यालयांत प्रथम क्रमांक मिळविलेल्या सभासदांच्या पाल्यांचा व त्यांच्या पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. दि.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.


प्रमुख वक्ते ॲड. प्रा. एन. एस. पाटील यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत विशद केले. ते म्हणाले, "खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्रीच्या सेवकांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, त्यांना आर्थिक आधार मिळावा या उदात्त हेतूने कै. र. भा. माडखोलकर सरांनी २३ ऑगस्ट १९६५ रोजी या पतसंस्थेची स्थापना केली. सेवकांच्या गरजा ओळखून त्यांनी सुरू केलेले हे छोटेसे रोपटे आज सर्वांच्या सहकार्याने एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. हीच त्यांच्या दूरदृष्टीची आणि सहकारावरील निष्ठेची खरी पावती आहे."


पुढे ते म्हणाले, "सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून विश्वास, पारदर्शकता, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांची जीवनमूल्ये जपणारी चळवळ आहे. सभासदांनी संस्थेला केवळ कर्जपुरवठा करणारी संस्था म्हणून न पाहता तिच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा. प्रामाणिकपणा, उत्तरदायित्व आणि आधुनिक व्यवस्थापनाचा स्वीकार केला तर कोणतीही सहकारी संस्था अधिक सक्षम बनू शकते. युवा पिढीनेही सहकाराची परंपरा जपून संस्थेला अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा." त्यांच्या प्रबोधनपर भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


अध्यक्षीय समारोपात जी. एस. पाटील यांनी पतसंस्थेची सहा दशकांची गौरवशाली वाटचाल ही संस्थापकांच्या दूरदृष्टीचा, पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेचा आणि सभासदांच्या विश्वासाचा परिणाम असल्याचे सांगितले. भविष्यातही हीच एकजूट कायम ठेवून पतसंस्थेला अधिक प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.


यानंतर पतसंस्थेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेमध्ये डॉ. अरुण जाधव, डॉ. टी. ए. कांबळे, प्रा. ए. डी. कांबळे, पी. एस. सावगावे, प्रा. व्ही. के. गावडे, एस. एम. भोगण आदी सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना विद्यमान सचिव एम. व्ही. बाणेकर यांनी सविस्तर व समाधानकारक उत्तरे देत शंकांचे निरसन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे व प्रा.अर्चना रेळेकर यांनी केले, तर ज्येष्ठ संचालिका सौ. नेत्रा पवार यांनी आभार मानले.


या हिरक महोत्सवी सोहळ्यास सौ. व्ही. आर. बांदिवडेकर, ॲड. आर. पी. बांदिवडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजानिस अनंत सुतार,संचालक एन. के. पाटील, एम. बी. पाटील, व्ही. डी. सडेकर, शामराव मुरकुटे, संस्थेचे सचिव एम. एम. तुपारे, प्रा. आर. पी. पाटील, एम. एम. फर्नांडिस, माजी प्राचार्य पी. आर. पाटील यांच्यासह पतसंस्थेचे संचालक डी. जे. पाटील, प्रा. गायकवाड, पी. जे. धुरी, डी. आर. भोई, कु. व्ही. के. पाटील, यू. एल. पवार, प्रा. एन. डी. हदगल, एन. पी. पोवार, तज्ज्ञ संचालक श्रीनिवास पाटील तसेच संस्थेचे आजी-माजी मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सहकार, कृतज्ञता आणि संस्थेच्या गौरवशाली परंपरेचा संगम घडविणारा हा हिरक महोत्सवी सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.

Post a Comment

0 Comments