रॉंग साईडने आलेल्या कारची अल्टोला जोरदार धडक; नवजात बाळासह चारजण गंभीर जखमी
नेसरी (ता.गडहिंग्लज) : नेसरी ते अडकूर रस्त्यावर कानडेवाडी गावच्या हद्दीत गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण वाहन अपघातात नवजात सात दिवसांच्या बाळासह एका कुटुंबातील चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुल विजय कुंदेकर (वय ३२, व्यवसाय शेती, रा. अडकूर, ता. चंदगड) हे पत्नी सुवर्णा, सासू आरती भांबर, मुलगा रुद्र व सात दिवसांच्या नवजात बाळासह सुझुकी अल्टो (MH04-DN-3749) या वाहनातून नेसरीहून अडकूरकडे घरी जात होते.कानडेवाडी गावच्या हद्दीत, भैय्यासो कुपेकर यांच्या बंगल्याजवळ आले असता,समोरून येणारी काळ्या रंगाची KIA Sonet (MH09-GA-7515) ही कार रॉंग साईडने, भरधाव वेगाने व निष्काळजीपणे येत समोरून जोरात धडकली.
या अपघातात अल्टो कारमधील राहुल कुंदेकर, त्यांची पत्नी सुवर्णा, सासू आरती भांबर, मुलगा रुद्र तसेच सात दिवसांचे नवजात बाळ सर्वजण गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे मुख्य कारण वाहनचालकाचे हयगयीचे व निष्काळजी वाहन चालवणे असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत नेसरी पोलीस ठाण्यात दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.३५ वाजता (ईस्ट्री नं. १९) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी स्वप्नील रविंद्र रानगे (रा. कोल्हापूर) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार २१५७ तडवी हे वरिष्ठांच्या आदेशानुसार करीत आहेत.
दरम्यान, नेसरी–अडकूर हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा असून याठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ग्रामस्थांचा नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा,आमदार शिवाजीराव पाटील पोलीस ठाण्यात दाखल, कुटूंबाचा आक्रोश, तात्काळ कारवाईची मागणी
नेसरी येथे घडलेल्या गंभीर अपघात प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या दिरंगाई व संशयास्पद भूमिकेविरोधात संतापाचा उद्रेक झाला असून, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी आज नेसरी पोलीस ठाण्यास भेट देत थेट पोलिसांना जाब विचारला. या घटनेच्या निषेधार्थ हजारो संतप्त ग्रामस्थांनी नेसरी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत न्यायाची मागणी केली.
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी वेळेत पंचनामा न केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. अपघात घडविणाऱ्या आरोपी वाहनचालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही, तसेच केवळ औपचारिक चौकशी करून आरोपींना मोकळे सोडण्यात आल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणात नेसरी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप ग्रामस्थ व आंदोलकांनी केला आहे. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
आमदार शिवाजीराव पाटील यांनी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावत,“दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही तात्काळ कारवाई झाली पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे,”असे ठणकावून सांगितले.तसेच, आजच्या आज दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाले नाही, तर मी स्वतः नेसरी पोलीस ठाण्यासमोर उपोषणास बसणार, असा ठाम इशाराही आमदार पाटील यांनी दिला आहे. लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे नेसरी परिसरात तणावाचे वातावरण असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.


Post a Comment
0 Comments