Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीची गळचेपी-बहुजन क्रांती सामाजिक संघटनेमार्फत तीव्र निषेध!


चंदगड | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद चंदगडमध्ये उमटले आहेत. बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित तातडीच्या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे यांनी आपल्या आक्रमक व परखड भाषणातून सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला यावेळी संघटनेने ठाम पाठिंबा जाहीर केला.


चंदगड तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या  भाषणात प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे  म्हणाले, "देशातील लाखो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, गैरव्यवहार आणि होत असलेल्या अन्यायामुळे तीव्र संतप्त झाले आहेत. हे तरुण आपले भविष्य वाचवण्यासाठी न्यायाची मागणी करतात, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर लाठीमार करणे ही अत्यंत निंदनीय बाब असून ही स्पष्टपणे लोकशाहीची गळचेपी आहे. सरकारने हा दडपशाहीचा मार्ग तातडीने सोडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर न्याय्य तोडगा काढावा, अन्यथा हा रोष संपूर्ण देशात पसरल्याशिवाय राहणार नाही."


या बैठकीत 'नीट'सह विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, देशभरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याबद्दल गांभीर्याने चिंता व्यक्त करण्यात आली. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक व अभिजित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांशी चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे हा लोकशाही मूल्यांवर झालेला थेट आघात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


बैठकीत कार्याध्यक्ष भिकाजीराव भोगोलिकर यांनी प्रास्ताविकातून देशातील वाढती अनागोंदी मांडली, तर पदाधिकारी शरीफ सय्यद आणि ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनीही आपल्या भाषणांतून केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या बैठकीस पांडुरंग कांबळे, श्रावण कांबळे, लखन कांबळे, राजेंद्र कांबळे, राजू कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व आभार बहुजन संघटक  पी. डी. सरवदे यांनी केले. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून त्यावर गदा आणणाऱ्यांविरुद्ध समाजाने आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अखेरीस, विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देणारा आणि लाठीमाराचा निषेध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

Post a Comment

0 Comments