Type Here to Get Search Results !

मर्यादित सुविधांवर मात; नऱ्हे महापालिका शाळेची गुणवत्तेची झेप!

 


धायरी | पुणे : आर्थिकदृष्ट्या मर्यादित संसाधने, अपुऱ्या भौतिक सुविधा आणि अनेक अडचणींचा सामना करत असतानाही धायरी येथील नऱ्हे महापालिका शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. विविध शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांतील उल्लेखनीय यशामुळे शाळेने महापालिका शाळांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.


२०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे २५ विद्यार्थी पात्र ठरले.या यशस्वी विद्यार्थ्यांना चार वर्षांत प्रत्येकी ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.


इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ विद्यार्थी पात्र ठरले असून, हुसेन अन्सारी, संकेत नवले, ब्रह्मानंद बोयाने, शाहिद शेख आणि ईश्वर बनसोडे यांनी शहरी शिष्यवृत्तीधारक म्हणून स्थान मिळवले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत २८ विद्यार्थी पात्र ठरले असून, अथर्व अंधारे यांनी २५२ गुणांसह विशेष यश संपादन केले.डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत संकेत नवले व हुसेन अन्सारी यांची श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या अंतराळ सहलीसाठी निवड झाली. तसेच कॉग्निझंट आयटी कंपनीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शार्दूल काकडे, स्वराज जागडे, रुद्र वाघमोडे,प्राजक्ता गावडे आणि किशोर वाघमारे यांनीही यश मिळवले.




या विद्यार्थ्यांना श्रीकांत जंगम, अनिल कदम, सुनील कटके, नितीन इंगोले, शिवाजी सरडे, सुरेंद्र पानसाडे आणि ऋचा लंबाते यांनी मार्गदर्शन केले. प्रभारी मुख्याध्यापक अंकुश माने यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशाबद्दल शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments