Type Here to Get Search Results !

हलकर्णीत तीनपानी जुगारावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, चौघे फरार


चंदगड | प्रतिनिधी : चंदगड पोलिसांनी हलकर्णी परिसरात सुरू असलेल्या तीनपानी पत्याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून तिघांना ताब्यात घेतले असून, चौघेजण पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २१ जुलै) सायंकाळी सुमारे ४.५५ वाजण्याच्या सुमारास हलकर्णी गावाच्या हद्दीतील जंगमहट्टी फाटा परिसरातील नाईक वस्ती येथे मोहन कृष्णा नाईक यांच्या खोपीसमोर उघड्यावर काहीजण पैशांवर तीनपानी पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती चंदगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.




या कारवाईत मोहन कृष्णा नाईक (वय ४७, रा. हलकर्णी), तानाजी यल्लाप्पा नाईक (वय ४०, रा. हलकर्णी) आणि सुनिल नामदेव पेडणेकर (वय ३८, रा. आंबेवाडी) यांना जुगार साहित्य व रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले. मात्र, लक्ष्मण नाईक (रा. हलकर्णी), रमेश सुतार (रा. जंगमहट्टी), दत्तु नाईक आणि पांडु नाईक (दोघे रा. वरंगाव) हे पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.छाप्यात पोलिसांनी १,९०० रुपयांची भारतीय चलनी नोटांची रोख रक्कम तसेच पत्यांचा संच असा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनिल महेश सुतार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबुलकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.दरम्यान, चंदगड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केल्याने अशा अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.




Post a Comment

0 Comments