Type Here to Get Search Results !

स्वयंभू श्री.चंद्रसेन मंदिराचा संस्कृतिक वारसा कसा जपण्यात आला ?

चंदगड शहरातील स्वयंभू श्री.चंद्रसेन मंदिराचा सांस्कृतिक वारसा,इतिहास व परंपरा कशी जपण्यात आली...

वाचा सविस्तर...

स्वयंभू श्री राजा चंद्रसेन मंदिर जीर्णोद्धार, वास्तुशांती व कलशारोहण सोहळा निमित्त चंदगड शहर आणि परिसरातील इतिहासाच्या पाऊलखुणा तसेच सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या सृजनशील नागरिकांनी लोकवर्गणी व लोकसहभागातून स्वयंभू श्री राजा चंद्रसेन मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर वास्तुशांती व कलशारोहण सोहळा दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने चंदगड शहर व परिसरातील प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे.

चंदगडचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा :-

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड हे तालुक्याचे मुख्यालय असून, इ.स. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी चंदगड महाल हा बेळगावचा एक भाग होता. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला सुमारे १२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पश्चिम दिशेला अवघ्या ४५ किलोमीटरवर बेळगाव शहर असल्याने चंदगडकरांची कोल्हापूरपेक्षा बेळगावशी अधिक व्यापारी आणि सामाजिक नाळ जुळलेली आहे.

चंदगड नगरी ही निसर्गाच्या मुक्तहस्ते वरदान लाभलेली, प्राचीन मंदिरसंस्कृती आणि आधुनिक धार्मिक संस्कार यांचा संगम असलेली नगरी आहे. येथे श्री देव रवळनाथाचे पुरातन मंदिर असून, सांप्रदायिक सलोख्याचे जिवंत उदाहरण म्हणून चंदगड ओळखले जाते. विविध जाती, धर्म व पंथांचे लोक येथे एकत्र नांदतात, परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि सामाजिक ऐक्याचा उत्तम आदर्श निर्माण करतात.

राजा चंद्रसेन व चंदगडचा इतिहास :-

इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहता, चंदगडमध्ये प्राचीन व मध्ययुगीन काळातील अनेक ऐतिहासिक साधने आढळतात. महाराष्ट्र राज्य गॅझेटियरमध्येही याचा उल्लेख सापडतो.

इ.स. १७२४ मध्ये सावंतवाडी संस्थानच्या फोंड सावंताच्या मुलगा नाग सावंत याने चंदगड महाल उध्वस्त करून तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्या आधी, येथे राजा चंद्रसेन यांचे राज्य होते, आणि चंदगड हे नाव त्यांच्या नावावरून पडले असल्याचे मानले जाते. राजा चंद्रसेन हे शिवभक्त होते, त्यामुळे त्यांच्या गडी वजा भुईकोट किल्ल्याच्या परिसरात शिवमंदिर व नंदीची मूर्ती आढळते. हे गड आणि किल्ले आता नामशेष झाले असले तरी त्यांचे अवशेष अजूनही चंदगडमध्ये पहायला मिळतात.

चंदगडच्या पुरातन रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी, मध्ययुगीन फारसी भाषेतील एक शिलालेख सापडला होता. दुर्दैवाने तो मातीच्या ढिगाऱ्यात गडप झाला. जर त्याचे वाचन झाले असते, तर चंदगडच्या गौरवशाली इतिहासाचे अनेक पैलू उलगडले असते.

संस्कृती आणि परंपरा :-

"प्रारंभी समाज संस्कृती घडवतो आणि नंतर संस्कृती समाज घडवते" या उक्तीप्रमाणे, चंदगडची धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यामध्ये राजा चंद्रसेन यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

आजही चंदगडमधील अनेक भागांना "चंद्रसेन गल्ली" किंवा "चंद्रसेन वाडा" असे संबोधले जाते, यावरूनच या महान परंपरेचा ठसा उमटलेला दिसतो. येथील सण- उत्सव, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम कोकणी पद्धतीने साजरे केले जातात.

चंदगड नगरीतील पहिला सार्वजनिक गणपती इ.स.१९५० मध्ये राजा चंद्रसेन मंदिरातच बसवण्यात आला होता. या ऐतिहासिक घटनेचेही लिखित पुरावे उपलब्ध आहेत.शिवाय, सातारा जिल्ह्याच्या गॅझेटमध्येही राजा चंद्रसेन यांचा उल्लेख सापडतो. साताऱ्याजवळ तळबीड येथे त्यांचे मंदिर असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे पाचवे सेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधीही तिथे आहे. याचप्रमाणे, चंदगडपासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या हेरे गावातील बाराव्या शतकातील शिवमंदिर हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून, त्याचा संदर्भ देखील राजा चंद्रसेन यांच्याशी जोडला जातो.

संस्कृती जतन करण्याची जबाबदारी :-

आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, नव्या पिढीला हाच वारसा दिला पाहिजे. आपण सारे एकत्र येऊन स्वयंभू राजा चंद्रसेन यांचा हा सोहळा उत्साहाने साजरा करूया.राजा चंद्रसेन आजही चंदगडवासियांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहेत. त्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे !

संदर्भ :-

महाराष्ट्र राज्य गॅझेटियर - कोल्हापूर जिल्हा

महाराष्ट्र राज्य गॅझेटियर - सातारा जिल्हा






Post a Comment

0 Comments