(मनोज जरांगे पाटील यांना ठाम पाठींबा,संभाजी चौक व पाटणे फाटा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव,सरकारविरोधात घोषणाबाजी)
चंदगड/प्रतिनिधी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता निर्णायक वळण लागले असून, याच पार्श्वभूमीवर आज चंदगड तालुक्यातील संभाजी चौक आणि पाटणे फाटा येथे मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणा दिल्या. मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर छेडलेल्या महाआंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर करत चंदगड तालुक्यातही संतप्त आंदोलन उभारण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी “हे आंदोलन आमच्या अस्तित्वाचे आहे, आता हा लढा शेवटपर्यंत जाईल”, अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पाटणे फाटा येथे धरणे आंदोलन छेडून सरकारला थेट इशारा देण्यात आला की, “मराठा समाजाचा विश्वासघात केल्यास रणशिंग फुंकले जाईल. महाराष्ट्रभर आवाज उठल्यावर तो दाबणे कोणाच्याही ताकदीत राहणार नाही.”संभाजी चौकातील आंदोलनात सुरेश सातवनेकर ,शांताराम गरबे ,लक्ष्मण गावडे,राजाराम सुकये, तर पाटणे फाटा येथे प्रा. दीपक पाटील, नितीन पाटील, विष्णू गावडे प्रभाकर खांडेकर, विलास पाटील, प्रताप पाटील, शंकर मनवाडकर, पांडुरंग जाधव , पांडुरंग बेनके,तानाजी गडकरी बाळू चौगुले शांताबाई जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते ज्वालामुखीसारख्या संतापाने सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी उमटलेल्या घोषणांनी वातावरण तापून गेले.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, “आता वेळ फार थोडी आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर महाराष्ट्रभर रणशिंग फुंकले जाईल आणि हा लढा सरकारला हादरवून सोडेल.”या आंदोलनामुळे चंदगड तालुक्यातील मराठा समाजातील असंतोष उघडपणे दिसून आला असून, येत्या काळात संघर्ष आणखी तीव्र होणार, अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
Post a Comment
0 Comments