Type Here to Get Search Results !

येत्या ७ ऑगस्ट ला ग्रामपंचायत दुंडगे येथील सरपंचावर अविश्वास ठरावासाठी विशेष ग्रामसभा.


चंदगड/प्रतिनिधी : ग्रामपंचायत दुंडगे येथे विद्यमान सरपंचांविरुद्ध अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभा व गुप्त मतदान प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सकाळी ८.०० ते संध्याकाळी ४.०० या वेळेत पार पडणार असून, मतदारांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विशेष ग्रामसभेचा मतदार म्हणून पात्र असलेल्या ग्रामस्थांची नावे मतदार यादीत समाविष्ट असून, त्यांनी सकाळी ८ ते ११ या वेळेतच सभास्थळी प्रवेश घेणे आवश्यक आहे. ११ नंतर येणाऱ्यांना सभेस प्रवेश दिला जाणार नाही.


सभेस येताना मतदारांनी आपले ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, पासपोर्ट इ.) तसेच मतदार यादीतील अनुक्रमांक सोबत आणावा. सभास्थळी पोहोचल्यानंतर मतदान सहाय्यता कक्षात नाव आणि अनुक्रमांकाची खात्री करून नोंदवहीवर स्वाक्षरी करावी व सभेस उपस्थित रहावे.११ वाजता सभा सुरू होणार असून त्यानंतर गुप्त मतदान प्रक्रिया पार पडेल. मतदारांनी नोंदणीवेळी मिळालेल्या स्लिपवरील मतदान केंद्र क्रमांकानुसार आपल्या केंद्रावर जाऊन मतदान करावे. मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते संध्याकाळी ४ या वेळेत होईल. मतदान हे अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरोधात असेल.


प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एकदा सभास्थळी आल्यावर सभा व मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणालाही बाहेर जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे अनुचित वर्तन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गंभीर नोंद घ्यावी.संपूर्ण प्रक्रिया अध्यासी अधिकारी तथा गटविकास अधिकारी (वर्ग-१), पंचायत समिती चंदगड यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. ग्रामस्थांनी शांततेत, जबाबदारीने आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करत मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments