(डॉ. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन-पत्रकार विजयकुमार दळवी यांचा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेकडून विशेष सत्कार)
चंदगड (प्रतिनिधी) : “वाचनातून विचार, विचारातून कृती आणि कृतीतून परिवर्तन – हीच डॉ. अब्दुल कलाम यांच्या विचारांची खरी दिशा आहे,” असा प्रेरणादायी संदेश देत वाचन प्रेरणा दिन चंदगड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दैनिक तरुण भारत चे मुख्य पत्रकार आणि सुप्रसिद्ध लेखक मा. विजयकुमार दळवी यांचा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे होते.अध्यक्षस्थानी बोलताना डॉ. कांबळे यांनी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती देत सांगितले की, “ही संघटना चंदगड तालुक्यातील बहुजन समाजातील साडेचार ते पाच हजार सभासदांच्या माध्यमातून कार्यरत असून, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. एकजूट, शिक्षण आणि संघटनाच आमच्या कार्याची खरी शक्ती आहे.”
तसेच त्यांनी पत्रकार विजयकुमार दळवी यांच्या दीर्घ पत्रकारितेतील योगदानाचा व साहित्यिक कार्याचा सविस्तर आढावा घेत, “दळवी यांनी गेल्या तीन दशकांपासून निर्भीडपणे जनतेचे प्रश्न मांडले. त्यांनी ग्रामीण भागातील सत्य परिस्थितीला आवाज दिला. त्यांचे लेखन समाजाला जागृत करणारे आहे,” अशा शब्दांत गौरव केला.
सत्कार कार्यक्रमात संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते पांडुरंग कांबळे (बुजवडे), राजू कांबळे (शिरगाव), सय्यद भैय्या (चंदगड), शाहीर मधुकर कांबळे, कोरज कुरतनवाडी व गंधर्वगडचे सरपंच अनंत कांबळे,संदीप यादव, विघ्नेश यादव (कानूर), अजित शेरसट्टी,अनंत कांबळे व सहकारी (कोंडाळी) उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विजयकुमार दळवी यांनी आपले अनुभव शेअर करत सांगितले,की “पत्रकारिता माझ्यासाठी केवळ व्यवसाय नाही, तर समाजसेवेचे साधन आहे. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मी चंदगड तालुक्यातील सामाजिक प्रश्न निर्भीडपणे मांडत आलो आहे. बेळगाव ते चंदगड हा रेल्वे मार्ग होणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून, हा मार्ग उघडल्यास सीमाभागाच्या विकासाला गती मिळेल,” असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले.तसेच तरुण पिढीला उद्देशून त्यांनी म्हटले, “मोबाईलच्या पडद्याऐवजी पुस्तकांच्या पानांत डोकावून बघा — तिथेच तुमचे विचार, प्रेरणा आणि ओळख सापडेल.”
कार्यक्रमाचे आभार बहुजन संघटक पी.डी सरवदे यांनी मानले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून चंदगड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजयकुमार दळवी यांचा हृदय सत्कार केल्याने वातावरण आनंदमय भावपूर्ण बनले, आत्मीयतेच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रेरणादायी कार्यक्रमाला बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments