Type Here to Get Search Results !

र.भा.माडखोलकरांचे ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी-डॉ.एन.के.पाटील


चंदगड : खेडूत शिक्षण संस्थेचे संकल्पक व माजी चेअरमन कै. र. भा. माडखोलकर सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आयुष्य झिजवले. त्यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांच्या तळमळीपूर्ण कार्याचा गौरव करण्यात आला. माडखोलकर सर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची प्रभावी वाट चालू केली आणि खेड्यापाड्यातील मुलांनाही उच्च शिक्षणाची सुवर्ण संधी दिल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विभागाचे डॉ. एन. के. पाटील यांनी आपल्या विस्तृत भाषणातून माडखोलकर सरांच्या शैक्षणिक, आणि प्रशासकीय कार्याचा आढावा घेतला. “र. भा. माडखोलकर सर हे ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील सेनानी होते. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सामर्थ्य आहे, हे त्यांनी ओळखले आणि त्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. इंग्रजी, विज्ञान, क्रीडा व सांस्कृतिक शिक्षणाची दारे खेड्यातील मुलांसाठी खुली करून ‘आम्हीही काहीतरी करू शकतो’ हा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी मांडले की, “त्यांची वचनबद्धता, काटेकोर व्यवस्थापन, शिक्षकांवरील विश्वास आणि विद्यार्थ्यांवरील अपार प्रेम या चार पायांवर संस्थेची भक्कम इमारत उभी आहे. आज विविध क्षेत्रात कामगिरी करणारे हजारो विद्यार्थी हेच त्यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे स्पष्ट केले की, “माडखोलकर सरांनी रुजवलेली शैक्षणिक मूल्ये आणि शिस्त ही आजही आमच्या कार्याची दिशा आहे. संस्थेची गुणवत्ता सतत उंचावत ठेवणे हेच त्यांच्या कार्यावरील आमचे ऋण मानणे होय.” कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली भूगोल विभाग प्रमुख डॉ. एन. एस. मासाळ यांनी माडखोलकरांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची माहिती दिली. त्यानंतर डॉ. एम. एम. माने आणि प्रा. व्ही. के. गावडे यांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणी उजाळताना त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेचे कौतुक केले.


इतिहास विभाग प्रमुख प्रा. ए. डी. कांबळे यांनी कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. आर. के. कमलाकर, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. के. एन. निकम, प्रा. गायकवाड, प्रा. आर. एस. पाटील यांच्यासह मारुती माडखोलकर, करुणा चंदगडकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारोपाच्या वेळी उपस्थितांनी माडखोलकर सरांच्या कार्याचा वारसा जपून त्याला नवे आयाम देण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या शताब्दी जयंती वर्षानिमित्त घेतलेला हा कार्यक्रम शिक्षण क्षेत्रासाठी नवी प्रेरणा ठरला.

Post a Comment

0 Comments