2️⃣ खोट्या सह्या करून शासकीय कागदपत्रांचा गैरप्रकार; तक्रार असूनही पोलिसांनी कारवाईस टाळाटाळ केल्याचा आरोप
3️⃣ ‘मूळ शिक्के कुठे बनवले तेथून आणा’ — पोलिसांच्या भूमिकेवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे प्रश्नचिन्ह
चंदगड : ग्रामपंचायतीच्या नावाने बनावट लेटर पॅड व शिक्के तयार करून सरपंच व ग्रामसेवकाच्या खोट्या सह्या करत त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी घेऊन अडकूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी चंदगड पोलिस ठाण्यात गेले असता, पोलिसांकडून मिळालेल्या ‘अजब सल्ल्या’मुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
अडकूर ग्रामपंचायत हद्दीत एका ठकसेन व्यक्तीने ग्रामपंचायतीचे अधिकृत लेटर पॅड तसेच ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवकाचे शिक्के बनावटरीत्या तयार केले. या बनावट शिक्क्यांवर खोट्या सह्या करून शासकीय कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याने अडकूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाईची मागणी करण्याचा निर्णय घेतला.यानुसार अडकूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन गुरव, उपसरपंच उज्वला देसाई, ग्रामपंचायत सदस्य अभिजित देसाई, शिवराज देसाई, सागर इंगवले, अल्ताफ चिंचणीकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ चंदगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते.
मात्र तक्रार स्वीकारून चौकशी सुरू करण्याऐवजी, “बनविलेले ओरिजिनल लेटर पॅड व शिक्के नेमके कुठे तयार केले आहेत, तिथून त्याची मूळप्रत आणा; तरच दोषींवर कारवाई करू,” असा अजब सल्ला पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या भूमिकेमुळे ग्रामपंचायत शिष्टमंडळाला कोणतीही तक्रार नोंदवून न घेता माघारी धाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.खोटे शासकीय कागदपत्र, बनावट शिक्के व खोट्या सह्यांचा गैरवापर हा गंभीर गुन्हा असताना, पोलिसांनी स्वतः तपास न करता तक्रारदारांकडूनच ‘पुरावे गोळा करून आणा’ अशी अपेक्षा ठेवणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी नेमकी अशी भूमिका का घेतली? कोणाच्या दबावाखाली कारवाई टाळली जात आहे का? असे प्रश्न तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.
या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असून, सामान्य नागरिकांच्या शासकीय कामकाजावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बनावट शिक्के व लेटर पॅड प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी अडकूर ग्रामपंचायतीसह तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment
0 Comments