Type Here to Get Search Results !

चंदगडमध्ये महा शेतकरी संमेलनाचे आयोजन


(आधुनिक शेती तंत्रज्ञान व ऊस पिक व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन)


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमता वाढीसाठी तसेच आधुनिक शेतीकडे वाटचाल घडवून आणण्याच्या उद्देशाने पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड (जय किसान) आणि चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी–विक्री संघ लिमिटेड, तुर्केवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा शेतकरी संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी–विक्री संघाच्या दाणेदार खत कारखाना, शिनोळी ता.चंदगड येथे होणार आहे.



‘नवीन युग, नवीन तंत्रज्ञान – जय किसानच्या साथीने’ या संकल्पनेतून आयोजित या संमेलनात शेतकरी बांधवांना ऊस पिक व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, माती परीक्षण व संतुलित खत व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेती कशी साधता येईल, यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.


या महा शेतकरी संमेलनाचे अध्यक्षस्थान मा. श्री. राजेश नरसिंगराव पाटील (माजी आमदार व चेअरमन, चंदगड ता. शे. सह. खरेदी–विक्री संघ, तुर्केवाडी) भूषविणार आहेत.


प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. अनिल चिंचोलकर (जनरल मॅनेजर, पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड), मा. श्री. स्वयंप्रकाश चौधरी (जनरल मॅनेजर, झुआरी फार्महब लिमिटेड), मा. श्री. कालिदास सावंत, मा. श्री. तानाजी पांडूरंग गडकरी (विभागीय व्यवस्थापक, पारादीप फॉस्फेट्स लि., कोल्हापूर व व्हाइस चेअरमन, चंदगड संघ) तसेच मा. श्री. एस. वाय. पाटील (व्यवस्थापक, चंदगड संघ) यांची उपस्थिती लाभणार आहे.


संमेलनात मा. डॉ. जयवंतराव जगताप (ज्येष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे) आणि मा. डॉ. अतुल पवार (एस.एम.एम., ए.ए.आय.सी., लांबोटी) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती, माती आरोग्य कार्ड, खतांचा योग्य वापर आणि उत्पादन वाढीच्या नव्या तंत्रांवर मार्गदर्शन करणार आहेत.


जय किसान परिवार, कोल्हापूर आणि चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी–विक्री संघ लिमिटेड, तुर्केवाडी यांच्या वतीने या उपक्रमातून शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि बाजाराभिमुख शेतीकडे प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

तरी तालुक्यातील व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या महा शेतकरी संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments