Type Here to Get Search Results !

चंदगडच्या लखपती पाटीलचा पराक्रम,500 वी शतकी राईड

 


पिंपरी-चिंचवडमधून उभी राहिली जिद्दीची प्रेरणादायी गाथा


पिंपरी-चिंचवड : तीन शिफ्टची नोकरी, रोजचा धकाधकीचा दिनक्रम आणि तरीही स्वप्नांचा पाठपुरावा… या सगळ्यांवर मात करत युवराज पाटील यांनी 500 वी शतकी राईड पूर्ण करत सायकलिंग विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, एक लाख किलोमीटरचा टप्पा पार केल्यामुळे आज रायडर्स त्यांना प्रेमाने “लखपती पाटील” म्हणून ओळखतात.


कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या गावातून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो किलोमीटरचा इतिहास बनला आहे. पिंपरी-चिंचवड येथील TKIL कंपनीत गेली 28 वर्षे कार्यरत असतानाही त्यांनी सायकलिंगची आवड जपलीच व तर ती एका मिशनमध्ये रूपांतरित केली.

सायकलिंगची सुरुवात केवळ 4 किमीच्या छोट्या राईडपासून झाली. सुरुवातीला 5 ते 10 किलोमीटर सुद्धा मोठं आव्हान वाटत होतं. मात्र हळूहळू शरीर आणि मन सवयीचे झाले आणि अंतर वाढत गेले. 25 ते 30 किमी सहज पार करत त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती, आळंदी, देहू, शंकर महाराज मठ,आणि शिरगावसारख्या ठिकाणांपर्यंत नियमित राईड्स सुरू केल्या.



पहिली शतकी राईड आजही पाटील यांच्या आठवणीत ताजी आहे. लोणावळा राईडदरम्यान तळेगाव आणि कामशेत येथील चढ त्यांनी सायकलवरून उतरून पार केले होते. ती राईड पूर्ण करण्यासाठी तब्बल 9 तास लागले होते. आज 500 शतकी राईड पूर्ण करताना त्या आठवणींवर ते स्वतःच हसतात.सायकलवर 5 तास बसलं की 100 किमी पूर्ण होतं… मग रस्ता कोणताही असो!”

या एका विचाराने त्यांनी 500 वेळा 100 किमीचा टप्पा पार केला!त्यांच्या मते, प्रत्येक शतकी राईड ही फक्त अंतर नसून एक अनुभव आणि शिकवण असते.


या प्रवासात त्यांनी अनेक लांब पल्ल्याच्या राईड्स यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्यामध्ये पुणे ते कन्याकुमारी (दोन वेळा), पुणे ते जगन्नाथ पुरी, सोमनाथ, उज्जैन, ओंकारेश्वर, घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर अशा धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात अष्टविनायक सायकलद्वारे पूर्ण करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. तसेच पंढरपूर सायकल वारीतही त्यांचा नियमित सहभाग असतो.


पुणे ते लोणावळा हा त्यांचा आवडता शतकी रूट असून, प्रत्येक राईडने त्यांना अधिक मजबूत, संयमी आणि जिद्दी बनवलं आहे. नुकताच युवराज पाटील यांनी सायकलिंग मधील एक लाख किलोमीटर चा टप्पा पूर्ण केला आहे, त्यामुळे त्यांना रायडर्स लखपती पाटील या नावाने ओळखतात. वेगापेक्षा सातत्य महत्वाचे आहे असे पाटील यांचे मत आहे.या यशामागे त्यांच्या सायकल्सची साथ, कुटुंबाचा पाठिंबा आणि सहकारी रायडर्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.


500 शतकी राईड्सचा हा टप्पा गाठत युवराज पाटील यांनी केवळ वैयक्तिक यश मिळवले नाही, तर सायकलिंगप्रेमींसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments