Type Here to Get Search Results !

मजरे कार्वेत हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्य विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

 


चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत हा सोहळा पार पडणार असून, संपूर्ण गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत या सोहळ्यासाठी भव्य नियोजन केले आहे.


उत्सवाच्या प्रारंभी मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी ध्वजारोहण, काकड आरती, पूजन व दीपप्रज्वलन यांसारख्या मंगल विधींनी कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर गावातील व परिसरातील भजनी मंडळांच्या सहभागातून हरिनाम सप्ताह, कीर्तन व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून भाविकांना धर्म, संस्कार व समाजप्रबोधनाचा संदेश दिला जाणार आहे.दरम्यान, दिवसाभरात विविध भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे  तसेच विविध नामांकित कीर्तनकार व कलाकारांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.


बुधवारी काकड आरतीने दिवसाची सुरुवात होऊन दिवसभर संगीत भजन, हरिपाठ यांचे आयोजन करण्यात येणार आहे. रात्री विशेष संगीत भजनाचा कार्यक्रम रंगणार असून, भाविकांना आध्यात्मिक समाधान लाभणार आहे.


हनुमान जयंतीच्या दिवशी मुख्य कार्यक्रम होणार असून, सूर्योदयाच्या पवित्र वेळी  हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. त्यानंतर भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यावेळी गावातून मिरवणूक निघणार असून, भजन, टाळ-मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय होईल.


यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविकांना प्रसादाचा लाभ मिळणार आहे. या सोहळ्यात महिला भजनी मंडळे, वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.या उत्सवात सहभागी होऊन श्री हनुमंतांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन ग्रामस्थ व आयोजक मंडळ, मजरे कार्वे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments