Type Here to Get Search Results !

कोदाळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


चंदगड (प्रतिनिधी) : कोदाळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साह, जल्लोष आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. गावात सर्वत्र उत्सवी माहोल असून कार्यक्रमाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विशेष उंची प्राप्त झाली. संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्था, कोदाळी यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

             

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. मधुकर जाधव सर यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा प्रभावी आढावा घेत “त्यांचे विचार केवळ वाचण्यासाठी नसून आचरणात आणण्यासाठी आहेत,” असा संदेश दिला.चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांनी समाजातील एकोपा, शिक्षण आणि प्रगतीसाठी बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले. उपसभापती संज्योती मळवीकर यांनी “जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे सांगत विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.

            

जिल्हा परिषद सदस्या रचना गावडे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांना प्रेरित केले. गटनेते पांडुरंग बेनके यांनीही मार्गदर्शन करत समाजजागृतीचा संदेश दिला.या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, जि. प. सदस्या रचना गावडे, पंचायत समिती सभापती विलास नाईक, उपसभापती संज्योती मळवीकर, गटनेते पांडुरंग बेनके, सरपंच योगिनी दळवी, उपसरपंच विठ्ठल गावडे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, निंगू दळवी, सदस्या अनुराधा कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी गायकवाड, प्राथमिक शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका सौ. सागरिका कुटे, शिक्षक महेश ढोले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप कांबळे यांनी केले, तर आभार विलास कांबळे यांनी मानले. शेवटी सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अवलंब करून समाज परिवर्तनासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments