कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात गोवा राज्यासाठी अधिकृत असलेले आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्य अवैधरित्या वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली.या कारवाईत 75 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
30 मार्च रोजी निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कोल्हापूर शहरातील प्रतिभानगर परिसरात पंचगंगा बँकेसमोर सापळा रचला.यावेळी संशयित मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार (क्र. MH 12 GF 6732) ही कार अडवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कागदी बॉक्समध्ये लपवून ठेवलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या 75 बाटल्या आढळून आल्या. प्राथमिक चौकशीत हे मद्य गोवा राज्यासाठी अधिकृत असून महाराष्ट्रात विक्रीस मनाई असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणात सागर शामराव देसाई (वय 32, रा. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण 3 लाख 94 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यामध्ये मद्याची किंमत 44 हजार 400 रुपये तर वाहनाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.ही कारवाई निरीक्षक किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक वाय. एन.फटांगरे, एस.पी.डोईफोडे,आर.एम. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे तसेच जवान मारुती पोवार, राजेंद्र कोळी, योगेश शेलार आणि राहुल कुटे यांनी यशस्वीपणे पार पाडली.या प्रकरणाचा पुढील तपास वाय.एन.फटांगरे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments