चंदगड प्रतिनिधी (रुपेश मऱ्यापगोळ ) : आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रलंबित राहिलेल्या पीक विमा अनुदानापैकी सुमारे २० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.बदलत्या हवामानामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार तसेच वादळी वाऱ्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाते. चंदगड तालुक्यातील विविध महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनी काजू व आंबा पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते.मात्र, चंदगड महसूल मंडळातील हवामान केंद्राचे काम अपूर्ण राहिल्याने नुकसानीची अचूक आकडेवारी उपलब्ध होत नव्हती. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित राहिले होते. ही बाब गांभीर्याने घेत आमदार शिवाजीराव पाटील यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
नागणवाडी महसूल मंडळातून हवामानाची माहिती संकलित करून शासनाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होऊन प्रलंबित अनुदान वितरित करण्यात आले. यासाठी तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण आणि सागर सुतार यांनीही सहकार्य केले.
यापूर्वीच तालुक्यातील काही महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना सुमारे ५५ लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. आता उर्वरित रक्कमही मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment
0 Comments