चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : केंद्रीय प्राथमिक शाळा अडकूर येथे सन 2025-26 शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या तब्बल 40 विद्यार्थ्यांचा चषक देऊन गौरव करण्यात आला. युनिटी फौंडेशन अडकूर व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदिच्छा व गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रस्ताविकाद्वारे अर्चना देसाई यांनी केली.यावेळी केंद्रप्रमुख डी. एस. पाटील, माजी अध्यक्ष आनंद निकम, उपाध्यक्ष विद्या आंबिटकर, राजकुमार करडी तसेच शरद देसाई यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या मनोगतात प्रांजल नाईक, वीरा वाडेकर, उपासना इंगवले, शिवन्या चौगुले यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी म्हणून मोठ्या आकाराच्या सिमेंट कुंड्या भेट देत पर्यावरणाबाबत जागरूकता दाखवून दिली.यावेळी अध्यक्ष दिलीप भेकणे यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून अडकूर शाळेने घेतलेली गरुडभरारी ही शिक्षक व पालकांच्या एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती असल्याचे सांगत सर्वांचे कौतुक केले.
युनिटी फौंडेशन अडकूरच्या माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. तसेच अवधूत संकपाळ या विद्यार्थ्याने शाळेसाठी पंखा भेट देत आपला सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन आवडण यांनी केले. यावेळी सरपंच सचिन गुरव, युनिटी अध्यक्ष मनोहर देसाई, महेश देसाई, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments