म्हाळेवाडी : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी म्हाळेवाडी येथे प्रक्षेत्र भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एकात्मिक हुमणी नियंत्रण मोहिमेअंतर्गत विविध उपाययोजनांचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.हुमणीच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रकाश सापळे, कामगंध सापळे, मेंटरायझियमद्वारे जैविक नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार रासायनिक औषधांचा वापर अशा विविध निर्मूलन पद्धतींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने या उपाययोजना राबवल्यास येत्या काही वर्षांत हुमणीचा प्रादुर्भाव पूर्णतः कमी होऊन ती नामशेष होईल, असा विश्वास जालींदर पांगरे यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधत शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “मागेल त्याला काजू कलमे”, “फार्मर कप स्पर्धा”, “भाऊसाहेब फुंडकर योजना” यांसारख्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
प्रक्षेत्र भेटीदरम्यान अजित पाटील यांच्या नाचणी प्लॉटलाही भेट देण्यात आली. उन्हाळी नाचणी उत्पादन वाढवून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. नाचणीसारख्या पौष्टिक पिकांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास वि.कृ.स.सं. जालिंदर पांगरे,मंडळ कृषी अधिकारी आर. आर. चव्हाण, सहाय्यक कृषी अधिकारी एस. डी. मुळे, ए. चव्हाण, कृषी सेवक टी. व्ही. वांद्रे, एस. ए. तांबे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments