चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : चंदगड तालुक्यातील उमगाव पेकी माळीवाडी येथे एका बेपत्ता वृद्धाचा सांगाडा शेतात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेंडा टेक नावाच्या शेतामध्ये हा सांगाडा आढळून आला असून, तो पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या धोंडीबा विठोबा सावंत (वय ७९, रा. उमगाव पेकी माळीवाडी, ता. चंदगड) यांचा असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.याबाबतची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे माळीवाडीसह संपूर्ण उमगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडीबा सावंत हे गेल्या १५ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घरातून शेताकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोधाशोध करूनही त्यांचा काहीच मागमूस लागला नव्हता. अखेर याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी चंदगड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान गुरुवारी शेंडा टेक परिसरातील शेतात काही नागरिकांना मानवी सांगाडा दिसून आला. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, प्राथमिक माहितीनुसार हा सांगाडा धोंडीबा सावंत यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
सुमारे पाच महिन्यांनंतर बेपत्ता वृद्धाचा सांगाडा सापडल्याने सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल ए. बी. नाईक करत असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

Post a Comment
0 Comments