चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील कानूर–भोगोली मार्गावरील भोगोलीजवळील धोकादायक पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत बहुजन क्रांती सामाजिक संघटनेने दिलेल्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलली आहेत.पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करत पुलावर लोखंडी अँगलचा मजबूत संरक्षणात्मक कठडा (रेलिंग) उभारला आहे.संघटनेच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेकडो नागरिकांची आणि वाहनधारकांची जीवघेणी कसरत थांबली असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
हा पूल दररोज शेकडो शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि वाहनचालकांच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडा नसल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थितीत येथे भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला होता. हाच गंभीर प्रश्न लक्षात घेऊन बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते भिकाजीराव भोगोलकर यांनी प्रशासनाचे डोळे उघडले.या प्रश्नावर महाराष्ट्र माझा 24 च्या बातमीमधून सत्यता दाखवण्यात आल्यानंतर प्रशासनाने दखल घेत तात्काळ सुरक्षा कवच लावले.
> "पावसाळ्यापूर्वी पुलाला संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने तात्काळ सुरक्षेची उपाययोजना करावी, अन्यथा लोकहितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा थेट व गर्भित इशारा भोगोलीकर यांनी प्रशासनाला दिला होता.
या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता देसाई यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी भिकाजीराव भोगोलीकर यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली व कोणतीही दिरंगाई न करता पुलावर लोखंडी अँगलचा मजबूत संरक्षणात्मक कठडा उभारण्याचे काम अवघ्या काही दिवसांत पूर्ण करून घेतले. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल नागरिकांनी उपअभियंता देसाई यांचेही कौतुक केले आहे.
सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ कागदावर न मांडता, त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे, ठाम भूमिका घेणे आणि प्रसंगी प्रशासनाला वाकवून काम करून घेणे हीच बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची खरी ताकद असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.या यशस्वी कामगिरीमुळे कार्याध्यक्ष भिकाजीराव भोगोलीकर यांच्या धडाडीचे व संघटनेच्या जनहितैषी कार्याचे भोगोली कानूर परिसरासह संपूर्ण चंदगड तालुक्यातून भरभरून कौतुक होत असून, "जनतेसाठी लढणारी संघटना" म्हणून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Post a Comment
0 Comments