Type Here to Get Search Results !

पुण्यातील कोट्यवधींच्या कॉल सेंटर घोटाळ्याचे धागेदोरे थेट चंदगड तालुक्यात!

 


एकूण १२ जणांवर कारवाई,दोन संशयित आरोपी चंदगड तालुक्यातील सापडल्याने खळबळ


चंदगड / प्रतिनिधी : पुण्यातील हडपसर आणि फुरसुंगी भागात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हायटेक कॉल सेंटरचा पर्दाफाश मुंबई आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केला आहे. या आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरलेल्या महाघोटाळ्याचे मुख्य धागेदोरे थेट चंदगड तालुक्याशी जोडले गेले असल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील दोन मुख्य मास्टरमाईंड चंदगड तालुक्यातीलच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


या धडक कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य सूत्रधारांना अटक केली आहे. यातील पहिला संशयित संतोष व्यंजनेकर (वय ४७) हा मूळचा चंदगड तालुक्यातील विंजने गावचा रहिवासी आहे, तर दुसरा विनायक उर्फ दीपक मनोहर इके (वय ४०) हा कडलगे बुद्रुक गावचा रहिवासी आहे. पुण्यासारख्या महानगरात बसून आंतरराष्ट्रीय पातळीवर करोडोंचा काळा बाजार करणारे मुख्य आरोपी आपल्याच तालुक्यातील आहेत हे समजताच चंदगड, विंजने आणि कडलगे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.


प्रतिष्ठित राजकीय व सामाजिक घराण्यांना धक्का!


या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि विशेष बाब म्हणजे, अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. विंजने येथील संतोष व्यंजनेकर याचे वडील अडकुर पंचक्रोशीतील प्रतिष्ठित राजकीय व सामाजिक नेते आहेत. तर कडलगे बुद्रुक येथील विनायक इके याचे वडील चंदगड तालुका खरेदी-विक्री संघात संचालक म्हणून कार्यरत आहेत.समाजात मानाचे स्थान असलेल्या अशा प्रतिष्ठित घराण्यांतील मुले या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुन्हेगारी रॅकेटचे मुख्य सूत्रधार निघाल्याने सर्वत्र तीव्र धक्का आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


साडेचार महिन्यांत कोट्यवधींचा गंडा; असा चालायचा गोरखधंदा-


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बेकायदेशीर कॉल सेंटर गेल्या साडेचार महिन्यांपासून हडपसर आणि फुरसुंगी परिसरातील अमनोरा चेंबर्स, ॲपेक्स अचिव्हर, जेकेएल इंडिया सोल्यूशन अशा पाच वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत गुप्तपणे चालवले जात होते. या हायटेक अड्ड्यावरून दररोज ३०० ते ४०० लोकांशी संपर्क साधून सुमारे ३० ते ४० लाख रुपयांची ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली लूट केली जात होती.सुरुवातीला लोकांना ऑनलाईन गेममध्ये लहान-मोठे विजय मिळवून देऊन पैशांचे आमिष दाखवले जायचे. एकदा का नागरिक मोठ्या रकमा गुंतवू लागले, की त्यांना जाणीवपूर्वक हरवले जायचे. त्यानंतर "पैसे परत हवे असल्यास आणखी पैसे ट्रान्सफर करा" अशी सक्ती करत त्यांची फसवणूक केली जायची. या काळ्या धंद्याचे जाळे दुबईपर्यंत पसरले असून, अमित मजेठिया हा दुबईतून सूत्रे हलवत होता, तर भागिरथ पांड्या नावाचा इसम या सर्व पैशांचे आर्थिक व्यवहार सांभाळत होता.


गावच्या पोरांना नोकरीचे आमिष अन् अल्पवयीन मुलांचे शोषण-


या तपासात समोर आलेली अत्यंत गंभीर बाब म्हणजे, यामध्ये पाच अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश होता. त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे जबरदस्तीने करून घेत त्यांचे मानसिक व आर्थिक शोषण केले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्रे गोळा करून, त्यांच्या नावावर बनावट बँक खाती उघडून हा कोट्यवधी रुपयांचा अवैध आर्थिक व्यवहार (मनी लाँड्रिंग) केला जात होता.


बेकायदा पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त-


मुंबई पोलिसांनी हडपसर व सायबर पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या या छाप्यात केवळ तंत्रज्ञानच नाही, तर घातक शस्त्रेही हस्तगत केली आहेत. चंदगडच्या संतोष व्यंजनेकर याच्याकडून एक बेकायदेशीर पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यावरून हे रॅकेट किती धोकादायक पातळीवर काम करत होते हे स्पष्ट होते.याशिवाय घटनास्थळावरून हार्ड डिस्क, एसएसडी, ऑटो डायलर मशीन, सिम कार्ड, विविध बँकांची चेकबुक, पासबुक, एटीएम कार्ड, लॅपटॉप, सोन्या-चांदीचे दागिने आणि मोठी रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.


न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी-


या हायटेक घोटाळ्याप्रकरणी पुण्याच्या मुंडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत एकूण १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. चंदगड तालुक्यातील हे दोन्ही मुख्य सूत्रधार सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पुढील सखोल तपास करत आहेत.पुण्यातील या धडक कारवाईनंतर एरवी शांत समजल्या जाणाऱ्या विंजने आणि कडलगे बुद्रुक गावात सध्या केवळ आणि केवळ या दोन्ही संशयितांच्या काळ्या कारनाम्यांची आणि त्यांच्या प्रतिष्ठित पार्श्वभूमीचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments