Type Here to Get Search Results !

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला चंदगडातून पाठिंबा; तहसीलदारांना निवेदन



चंदगड : समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांबाबत दिल्ली येथे सुरू केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, चंदगडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. याबाबतचे निवेदन आज चंदगड तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले.


देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे केंद्र शासनाने गांभीर्याने व संवेदनशीलतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी मांडण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन शासनाने संबंधित घटकांशी संवाद साधावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.


लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा असून, तरुणांच्या भावना आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांचा आदर राखणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे समितीने स्पष्ट केले. संवादाच्या माध्यमातून अनेक प्रश्न शांततेने सोडविता येतात आणि समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण होते. लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून परस्पर आदर, समानता, न्याय आणि संवाद या मूल्यांवर तिची उभारणी झालेली आहे. जागरूक तरुण आणि उत्तरदायी प्रशासन यांच्या सहभागातून देश अधिक सक्षम, प्रगत आणि न्यायपूर्ण बनू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.


यावेळी समितीचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब शिरगावकर, सचिव सुरेश दळवी, चंदगड शहर प्रमुख रंजीत गावडे, नागणवाडी विभाग प्रमुख विलासकुमार विंझणेकर, हलकर्णी विभाग प्रमुख मनोज कांबळे, बेरड-रामोशी समाज संघटक रवी नाईक आणि भुजंग नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments