Type Here to Get Search Results !

बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची चंदगड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!



(जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या झांबरे गावच्या सरपंच विष्णू गावडे यांचा संघटनेतर्फे गौरव)


चंदगड : चंदगड येथे बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे होते.बैठकीच्या प्रारंभी बहुजन संघटक पी. डी. सरवदे यांनी प्रस्ताविकातून संघटनेच्या आतापर्यंतच्या सामाजिक वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे (भोगोलिकर) यांनी उपस्थितांचे स्वागत करून संघटनेची आगामी दिशा स्पष्ट केली.


यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत सामाजिक परिवर्तनासाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणत शिक्षण, सामाजिक न्याय आणि प्रबोधनाच्या माध्यमातून बहुजन समाज अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.


बैठकीत शरीफ सय्यद, पांडुरंग कांबळे, राजू कांबळे (माजी सरपंच), परशराम कांबळे, संतोष कांबळे, श्रावण कांबळे यांनी विविध सामाजिक विषयांवर आपली मते मांडली.बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे चंदगड तालुक्यातील झांबरे गावाने कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्या गावचे सरपंच विष्णू गावडे यांचा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना विष्णू गावडे यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चंदगड तालुक्यात सामाजिक क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करणाऱ्या अग्रेसर संघटनांमध्ये बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे स्थान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.


अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी समाजहितासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. बैठकीचे आभार पांडुरंग कांबळे (बुजवडेकर) यांनी मानले.बैठकीस  संतोष कांबळे,शरीफ सय्यद , राजू  कांबळे, पांडुरंग कांबळे, श्रावण  कांबळे, परशराम कांबळे,  यांच्यासह तालुक्यातील विविध भागांतील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक एकजूट, संघटनात्मक बळकटी आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments