चंदगड तालुका जुनी पेन्शन संघटनेचा इशारा; सुमारे १५० शिक्षकांचा बैठकीला सहभाग
चंदगड | प्रतिनिधी : अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी चंदगड तालुका जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने कार्वे येथील व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. शासनाने येत्या ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ द्यावा; अन्यथा आगामी पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. तसेच २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली, मात्र प्रत्यक्ष भरती त्यानंतर झालेल्या काही कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शनचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना अद्याप या योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला.
या प्रश्नावर संबंधित मंत्री व शासनस्तरावर यापूर्वी बैठका झाल्या आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असूनही त्यांना पेन्शनचा अपेक्षित लाभ मिळालेला नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत शिक्षकांनी शासनाला अंतिम मुदतीचा इशारा दिला. ५ सप्टेंबरपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू न झाल्यास आगामी पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा ठराव एकमताने करण्यात आला.
या बैठकीस चंदगड तालुक्यातील सुमारे २० शाळांमधील १५० शिक्षक उपस्थित होते. बैठकीस आर. जे. पाटील, श्रीकांत पाटील, गुलाब पाटील, अनिल ओऊळकर, मोहन पाटील, परशराम पवार, एन. एस. पाटील, अशोक देवन, अनंत पाटील यांच्यासह सचिव पी. आर. गावडे, पी. के. पाटील, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments