Type Here to Get Search Results !

नवनियुक्त उपजिल्हाधिकारी राजेश चव्हाण यांचा बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे सत्कार

 


चंदगड :  ‘प्रशासकीय पद हे केवळ अधिकाराचे नसून सर्वसामान्य जनतेच्या सेवेचे प्रभावी माध्यम आहे,’ हा आदर्श आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरविणारे चंदगडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेश चव्हाण यांची उपजिल्हाधिकारी (डेप्युटी कलेक्टर) पदावर पदोन्नती झाल्याबद्दल बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने विशेष नागरी सत्कार करण्यात आला.


यावेळी संघटनेचे प्रमुख संघटक पी. डी. सरवदे, कार्याध्यक्ष भिकाजीराव भौगोलिकर, लखन कांबळे, श्रावण कांबळे, शरीफ सय्यद यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


चंदगड तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत असताना राजेश चव्हाण यांनी सर्वसामान्य नागरिक, वंचित घटक आणि शेतकरी वर्गाच्या प्रश्नांना प्राधान्य देत लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड तसेच विविध महसूलविषयक क्लिष्ट प्रकरणांमध्ये नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी त्यांनी पारदर्शक, गतिमान आणि संवेदनशील कार्यपद्धती राबविली. त्यांच्या कार्यामुळे प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद अधिक  सुकर झाला 


सत्कार सोहळ्यादरम्यान बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील विविध मागासवर्गीय व दलित वस्त्यांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मागासवर्गीय व दलित वस्त्यांसाठी उपलब्ध होणाऱ्या १५ टक्के निधीचा विनियोग संबंधित वस्त्यांच्या विकासासाठी त्याच ठिकाणी करण्यात यावा, तसेच मागासवर्गीय समाजासाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध योजनांचा लाभ अन्यत्र वळविण्याऐवजी ज्या घटकांसाठी व ज्या वस्त्यांसाठी निधी व योजना मंजूर आहेत, त्याच ठिकाणी त्यांचा प्रभावी वापर करण्यात यावा, अशी सक्त सूचना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केली.


मागासवर्गीय व दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता, वीज तसेच इतर विकासकामांना प्राधान्य मिळणे आवश्यक असून, शासनाचा निधी त्याच लाभार्थी घटकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.


सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त उपजिल्हाधिकारी राजेश चव्हाण यांनी बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी संघटना करीत असलेले कार्य आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या अखेरीस बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून निष्कलंक आणि प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या राजेश चव्हाण यांची उपजिल्हाधिकारीपदी झालेली पदोन्नती ही त्यांच्या अथक लोकसेवेची खरी पोचपावती असल्याचे त्यांनी सांगितले. चव्हाण यांनी चंदगड तालुक्यातील आपल्या कार्यकाळात सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ केला असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय कारकिर्दीतही वंचित व सर्वसामान्य घटकांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करून प्रा. डॉ. कांबळे यांनी त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments