चंदगड प्रतिनिधी : चंदगड वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची मिळणारी भरपाई ही तुटपुंजी असून उसाला ३ हजार व अन्य पिकांना प्रति गुंठा २ हजार मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन चंदगड तालुक्यातील पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले. वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेले शेतकरी आक्रमक बनल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
चंदगड तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून शासनाकडून मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे. ती वाढवून मिळावी यासाठी मंगळवारी पाटणे वनविभाग कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. रात्रीचे दिवस करून काढलेल्या पिकाची योग्य भरपाई आमच्या हक्काची असून ती मिळावी असे म्हणत शेतकरी आक्रमक बनले. वन्यप्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करा, पीक नुकसानीचे पंचनामे त्याच गावात झाले पाहिजे, यासह अनेक मागण्यांचे निवेदन वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व नंदकुमार भोसले यांना देण्यात आले. निवेदनातील मागण्यांसाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मोर्चात ॲड. संतोष मळवीकर, जगन्नाथ हुलजी, सोमनाथ चांदेकर, सुधाकर गावडे, जयवंत बागवे, महांतेश बागवे, राजीव पाटील, मारुती अनगुडे, बाबू कोळसुंदकर, विजय मोरे, सुनील शिंदे, सुनील नाडगौडा, नामदेव पाटील, संपत पेडणेकर, रवळू गावडे, आप्पाजी गावडे आर्दीसह शेतकरी सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments