Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये ५ एप्रिलला युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलन.

गडहिंग्लज/प्रतिनिधी : पहिले युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलन गडहिंग्लज येथे ५ एप्रिलला पार पडणार आहे.आताच झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक होते. यापूर्वी जनवादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने सावंतवाडी येथे २०२२ साली पहिले जनवादी साहित्य संमेलन झाले होते.तर दुसरे संमेलन कोल्हापूर येथे गतवर्षी पार पडले होते.गडहिंग्लज येथे हे पहिलेच युवा जनवादी साहित्य संमेलन यावर्षी होत आहे. 

या समेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा.सुनील शिंत्रे यांची तर संयोजन समितीच्या अध्यक्षपदी स्वाती कोरी यांची निवड करण्यात आली.प्रा. सुभाष कोरे यांनी प्रास्ताविक करून या बैठकीचा हेतू सांगितला.यावेळी जनवादी सांस्कृतिक चळवळीचे सचिव अंकुश कदम म्हणाले की,साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात दलित, आदिवासी, भटके विमुक्त, बहुजन कष्टकरी अल्पसंख्याक स्त्री पुरुषांच्या बाजूने सकारात्मक हस्तक्षेप करावा या हेतूने ही चळवळ उभी राहिली आहे. दोन संमेलने यशस्वीपणे पार पडल्यानंतर हे संमेलन खास युवक युवतींसाठी घेण्यात येणार आहे. हे पहिले युवा जनवादी साहित्य संस्कृती संमेलन आपण सारे मिळून यशस्वी करूया. 

कॉ.संपत देसाई म्हणाले की सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात मूल्यांची पडझड सुरू आहे, अशावेळी तरुणाई सोबत संवाद होणे गरजेचे आहे. म्हणून हे खास युवा साहित्य संस्कृती संमेलन आयोजित केले आहे.संमेलनाचे अध्यक्ष, उदघाटक, प्रमुख पाहुणे लवकरच निश्चित करून जाहीर करण्यात येतील. यावेळी प्रा सुनील शिंत्रे, ऍड दिग्विजय कुऱ्हाडे, अरविंद बारदेस्कर यांनी कांही महत्वाच्या सुचना मांडल्या. 

या संमेलनाच्या आयोजनासाठी संयोजन समिती करण्यात आली. संयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून ऍड दिग्विजय कुऱ्हाडे,कार्याध्यक्ष प्रा सुभाष कोरे, सहकार्याध्यक्ष प्रा शिवाजीराव होडगे, कोषाध्यक्ष प्राचार्य सातप्पा कांबळे यांची निवड करण्यात आली. पुढील बैठकीत इतर समित्या निवडल्या जाणार आहेत.सदर बैठकीला प्रा.अनिल उंदरे,विद्याधर गुरबे, सतीश तेली, बजरंग पुंडपळ, प्रा नवनाथ शिंदे, नागेश चौगुले, प्रा सुरेश वडराळे, युवराज बरगे, महेश पेडणेकर, रणजित कालेकर, कृष्णा सावंत, राजेंद्र कांबळे, राहुल कदम हे उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments