Type Here to Get Search Results !

पोहायला जाताय... मग जरा जपूनच..!

चेष्टा जीवावर बेततेय; अतिधाडस नको, सुरक्षा साधने सोबत हवीच


काय करायला हवे ?


धोकादायक ठिकाणी पोहायला जाणे टाळा


पोहायला जाताना सुरक्षा साधने सोबत ठेवा


हृदयरोगींनी काळजी घेऊन पोहायला हवे


पोहता येणाऱ्या मोठ्या व्यक्तींनी लहान मुलांसमवेत राहावे


चंदगड/प्रतिनिधी : दिवसेंदिवस उन्हाचा जोर वाढत चालला असून खेडेगावात मुले उन्हाच्या तडाक्यातून वाचण्यासाठी नदीत व विहिरीत उड्या मारून पोहण्याचा आनंद मनसोक्त लुटत आहेत. हल्ली पोहायला जाणाऱ्या मुलांच्या गर्दीत वाढ झाली असून धोकाही तितकाच वाढला आहे  क्षणिक थंडावा देणारे सुख निष्काळजीपणामुळे जीवावरही बेतू शकते. याचा अनेकांना विसर पडून अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत.


जिल्ह्यात आठवड्यात तरुण मुलांचा पोहताना हकनाक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी पोहायला जाणाऱ्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या सकाळच्या शाळा तर कॉलेजला सुट्टी पडण्याचा हंगाम सुरू झाल्याने पाहुणे आणि त्यांची मुले गावात दाखल झाली आहेत. काही शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे पाहुण्यांची मुले सुट्टीला आली आहेत. कडक उन्हाळा असल्याने दुपारच्यावेळी अनेकजण पोहण्याचा आनंद घेत असतात. कोणी स्वतः च्या कुटुंबासोबत तर कुणी मित्र परिवारासमवेत नदी, तलाव आणि विहीरींवर पोहायला जातात; परंतु पुरेशी काळजी आणि दक्षतेअभावी क्षणाचा आनंद जीवावर बेतण्याची शक्यता असते.नदी, विहिरीत उड्या मारताना काळजी गरजेची नदी, पाणवठे, विहिरींवर पोहायला जाणाऱ्याची संख्या वाढली आहे. मुलांची हुल्लडबाजी, नदी, विहिरींवरील झाडांवरून उड्या मारणे, पोहतानाचेष्टा करणे, पोहायला न येणाऱ्या सहकाऱ्याला पाठीवर घेऊन नदी पात्राच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करणे, अचानक पोहायला जाऊन नदी पात्रापलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार मुलांच्या जीवावर बेतू लागले आहेत. त्यामुळे पोहायला जाणाऱ्या सर्वांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


पोहण्याची शर्यत नको :-

अनेक तरुण मुले पोहताना शर्यत लावतात. शर्यतीमुळे आपण जिंकलेच पाहिजे असा अट्टाहास धरून मुले पोहतात. परिणामी दूर लांब जातात जिथे गेल्यानंतर मुलांना दम लागतो. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व वाचवणाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेकदा जीव जातो. त्यामुळे अशी शर्यत स्पर्धा जीव घेणे ठरते.बंधाऱ्यावरून उड्या मारताना काळजी घ्या.

Post a Comment

0 Comments