Type Here to Get Search Results !

बेळगावात मराठा जगदगुरू श्री मंजूनाथ स्वामीजींच्या सान्निध्यात भक्तीमय संध्या संपन्न.

बेळगाव/प्रतिनिधी : बेळगावातील वडगाव येथील पटवर्धन ले-आऊट गार्डनमध्ये एक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मराठा समाजाचे आधारस्तंभ, परम पूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांची उपस्थिती लाभली होती.


कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गोपाळ बिर्जे, वर्षा बिर्जे, आप्पासाहेब गुरव आणि शंकर पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सायंकाळी ४ ते ५ या वेळेत बेळगावातील १५ महिला भजनी मंडळांनी सामूहिक भजन सादर करून वातावरण भक्तीमय केलं. ‘भक्तीमध्येच शक्ती आहे’ हा संदेश त्यांच्या भजनातून स्पष्टपणे उमटला.त्यानंतर ५ ते ६ या वेळेत स्वामीजींचं “अध्यात्मिक व सामाजिक चिंतन” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन झालं. त्यांनी समाज प्रबोधन, स्त्री शक्ती, संस्कार, मराठा समाजाचं योगदान आणि नवयुवकांच्या भूमिका यावर मार्गदर्शन केलं. श्रोत्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या त्यांच्या शैलीतून अनेकांनी नवीन दिशा घेतली.


६ ते ७ या वेळेत स्वामीजींचं रागाधारित शास्त्रीय भजनगायन झालं. “मन लागो रे भजन करीलें रे, लहान पण दे गा देवा” यांसारख्या भजनांनी रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.या संगीत सत्राला हार्मोनियमवर चंद्रज्योती देसाई आणि तबल्यावर आकाश सौदागर यांनी सुरेख साथ दिली. चंद्रज्योती देसाई यांचं वादन विशेष गोडीची आणि भावस्पर्शी साथ ठरली.या भक्तिपूर्ण संध्याकाळी बेळगावच्या शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून, मराठा समाजाच्या एकतेचं, श्रद्धेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा जागृती निर्माण संघाचे प्रमुख गोपाळराव बिर्जे यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमाकवी रविंद्र पाटील यांनी केल तर वर्षा तोपिनकट्टी हीने आभार मानले.

Post a Comment

0 Comments