Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनो, करिअर साठी जिद्द व आत्मविश्वास बाळगा-माजी प्राचार्य डॉ. पी.आर.पाटील


(माडखोलकर महाविद्यालयात रोजगार मेळाव्यासाठी भर पावसातही तरुणांचा उदंड प्रतिसाद)

चंदगड/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर करून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी प्राप्त करण्यासाठी जिद्दीने व चिकाटीने  प्रयत्नशील राहायला हवे असे आवाहन खेडूत  शिक्षण संस्थेचे संचालक व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पी.आर.पाटील यांनी केले.ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एल. डी.कांबळे होते.


डॉ. पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, खेड्यापाड्यातल्या बहुजनांच्या गोरगरीब व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपला लाजाळूपणा सोडून निर्भीडपणे आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रामाणिकपणे झगडले पाहिजेत. कोणतेही क्षेत्र कमी दर्जाचे नसते, यासाठी कोणत्याही कामाची लाज न  बाळगता ध्येय प्राप्तीसाठी व उज्वल करिअरसाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहून जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन करून त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रास्ताविक प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. आर.एन.साळुंके यांनी करून महाविद्यालयामार्फत यापूर्वीही  वेगवेगळे रोजगार मिळावे घेतल्याने शेकडो विद्यार्थी नामांकित कंपन्यामध्ये उच्च पदावर काम करत असल्याचे सांगून या विभागामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा घेतला.


अध्यक्षीय  भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष एल डी कांबळे म्हणाले की, खेडूत शिक्षण संस्थेने आपली गुणवत्ता टिकवून  वेगळेपण जपले आहे. सध्याच्या बाजारीकरणाच्या काळात संस्थेने विद्यार्थ्याभिमुख व गोरगरिबांच्या  शिक्षणाची सोय केल्याची माहिती सांगून त्यांनी संस्थेच्या दैदिप्यमान कार्याचा आढावा घेतला.प्रारंभी रोजगार मेळाव्याचे उद्घाटन माजी प्राचार्य डॉ. पी. आर.पाटील उपाध्यक्ष एल डी कांबळे व कंपनीच्या वेगवेगळ्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ संचालक  सुदेश पाटील, तानाजी पोपकर यांनीही विद्यार्थ्यांना कंपनी जॉब, वेगळ्या कंपनीच्या नेमणुकी संदर्भातील महत्त्वाची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले.या रोजगार मेळाव्यातून वेगवेगळ्या विविध कंपन्या मधून 84 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन डॉ. एन. एस. मासाळ यांनी तर आभार डॉ. टी. ए. कांबळे यांनी मानले.भर पावसातही रोजगार मेळाव्याला तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

 

या मेळाव्यासाठी रामदास पाटील, ज्योतिबा मुंगुरवाडे, अजय कांबळे, दिगंबर मुर्डेकर. यांच्यासह मुंबई पुणे हैदराबाद,बेंगलोर धारवाड येथील वेगवेगळ्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments