Type Here to Get Search Results !

दुय्यम निबंधक अधिकारी वसंत कुंभार निलंबित.

 


(मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची खातेनिहाय चौकशी)


कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा दिले.गारगोटीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि राज्य शासनाच्या मालकीच्या विश्रामगृहाच्या जागा विक्रीप्रकरणी भुदरगडचे दुय्यम निबंधक अधिकारी वसंत कुंभार यांना महसूलमंत्र्यांनी तडकाफडकी निलंबित केले. हा माणूस सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर कार्यालयात राहता कामा नये, असे महसूलमंत्र्यांनी बजावले.अधिकृत सूत्रांनी त्यास दुजोरा दिला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पत्रानुसारच दृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.


मंगळवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुणे विभागातील अधिकाऱ्यांची व्हीसीव्दारे बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी वाघमोडे यांच्याबद्दलच्या तक्रारींचा विषय काढला. त्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी कुंभार यांना तातडीने निलंबित करण्याच्या तर वाघमोडे यांची खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला.जिल्ह्यातील गावठाण वाढीसाठी सर्व्हे, देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासंबंधी पालकमंत्री आबिटकर यांनी बैठकीची मागणी केली होती. त्यास पालकमंत्री आबिटकर, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महसूलचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. यामध्ये पालकमंत्री आबिटकर यांनी वाघमोडे यांच्याबद्दलच्या तक्रारी केल्या. त्याची दखल घेऊन महसूलमंत्री बावनकुळे यांनी त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.


ही चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री आबिटकर यांनी गारगोटी येथील सरकारी विश्रामधामच्या विक्रीचा विषय उपस्थित केला. गटक्रमांक ५२६ अ मधील २६ गुंठ्याची खरेदी १९ डिसेंबर २०२४ ला रेडिरेकनरप्रमाणे ४० लाख रुपये किमतीला झाली आहे. या जमिनीच्या सातबारा पत्रकी १९८५ पासून पीकपाणी सदरात ५ गुंठे विश्रामधाम इमारतीची नोंद आहे. या जागेच्या उताऱ्यावर भोगवटादार वर्ग एक आहे. त्यावर इतर कोणताही शेरा नाही. महसूल यंत्रणेने त्यावर सरकारी जमीन म्हणून नोंद करणे अपेक्षितपणे होते.ती त्यांनी न केल्याने या जमिनीचा व्यवहार झाला आहे.

दुय्यम निबंधक वसंत कुंभार यांनी या जागेचा खरेदी-विक्री व्यवहार करताना अधिक चौकशी करण्याची गरज होती असे मंत्री आबिटकर यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. शासनाच्या विश्रामगृहाची विक्री झाल्याचे ऐकल्यावर महसूल मंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन कुंभार यांना आजच्या आज निलंबित करण्याचे आदेश दिले.विश्रामगृहाचा व्यवहार होत असताना जिल्हा मुद्रांक अधिकारी म्हणून तुम्ही काय करत होता, अशी विचारणा बैठकीत वाघमोडे यांना करण्यात आली.

Post a Comment

0 Comments