Type Here to Get Search Results !

रुग्णांना नवजीवन देण्यासाठी राज्यभरात ‘अवयवदान’ चळवळ म्हणून राबविणार-प्रकाश आबिटकर

 


मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी येत्या ३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबवावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत दिले. 


या बैठकीत मार्गदर्शन करताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यात राबविण्यात येत असलेल्या अवयवदान उपक्रमाचा आढावा घेतला व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी त्यांना नवजीवन मिळावे, यासाठी अवयवदान ही एक चळवळ म्हणून राबवावी व व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश दिले.अवयवदानाबाबत सकारात्मकरित्या मतपरिवर्तन करून अवयवदानाविषयी असणारी भीती कमी करावी, तसेच प्रभावीपणे पद्धतीने काम करून सकारात्मक परिणाम दिसतील अशी विश्वासार्ह मोहीम दि. ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवावी, अशा सूचना दिल्या. त्याचप्रमाणे, दि. १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांचा सत्कार करावा व मोहिमेला सकारात्मकरित्या गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या. राज्यातील मोहिमेचा नियमित आढावा घेऊन अवयवदानासाठी व्यापक जनजागृती करावी, लोकांमध्ये असणारी भीती कमी करून सामाजिक दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच अवयवदानासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समित्या यांनी व्यापकपणे काम करून महाराष्ट्राला अवयवादामध्ये अग्रेसर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


यावेळी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, अवयवदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून अधिकाधिक रुग्णांना अवयव मिळावेत, यासाठी पंधरवड्यात प्रभावी कामकाज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत अवयवदान पंधरवडा म्हणून राबविण्यात येत असून विभागीय प्रत्यारोपण समिती मार्फत विभागनिहाय जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या कुटुंबीयांनी  सामाजिक भान जागृत ठेवून मेंदू मृत झालेल्या रुग्णांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला होता, त्यांचा तसेच अवयव दानामुळे नवजीवन प्राप्त झालेल्या व्यक्तींचा स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 


या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यांचे अधिकारी तसेच रुग्णालय सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, केईएम रुग्णालयाचे डॉ. आकाश शुक्ला , उपसंचालक, डॉ. कैलास बाविस्कर, सहायक संचालक डॉ. फडणीस व दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय उपसंचालक व क्षेत्रीय अवयवदान प्रत्यारोपण समितीचे अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments