Type Here to Get Search Results !

ब्लॅक पँथर पक्षाच्या शहराध्यक्ष पदी अर्जुन शिंदे यांची निवड.


कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात सामाजिक न्याय, दलित व वंचितांच्या हक्कासाठी सतत लढा देणाऱ्या ब्लॅक पँथर पक्षाच्या शहराध्यक्षपदी अर्जुन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते विजय घाटगे यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केले. तसेच किशोर यादव, रोहित गाडीवडर, महेश गाडीवडर यांची प्रमुख उपस्थिती होती.


अर्जुन शिंदे यांच्या निवडीमुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय चळवळींना नवे बळ मिळणार आहे. शिंदे यांनी यापूर्वी युवकांमध्ये शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दलित, मागासवर्गीय, श्रमिक व वंचित घटकांच्या प्रश्नांना ठाम आवाज मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “ब्लॅक पँथर पक्ष हा केवळ राजकीय संघटनाच नाही, तर समाजाच्या प्रबोधनाची चळवळ आहे. जाती-धर्म, अन्याय-अत्याचार याविरुद्धचा लढा अजूनही अपूर्ण आहे. शिंदे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वामुळे पक्षाची मुळे अधिक घट्ट रुजतील.”


नवीन शहराध्यक्ष म्हणून बोलताना अर्जुन शिंदे म्हणाले, “समाजातील प्रत्येक वंचित, शोषित आणि पीडित व्यक्तीचा आवाज बुलंद करणे हेच माझे ध्येय आहे. ब्लॅक पँथर पक्षाच्या विचारधारेतून सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा आम्ही निश्चय केला आहे.”


या निवडीमुळे कोल्हापूर शहरातील पक्षाचे कार्य आणखी गतिमान होणार असून, युवकांना संघटित करून सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यास अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments