Type Here to Get Search Results !

मुसळधार पावसाने चंदगड दणाणला!


(प्रकल्प शंभर टक्के भरले; नद्यांना पूर, अनेक बंधारे पाण्याखाली)


चंदगड (प्रतिनिधी) :चंदगड तालुक्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने कहर केला आहे. जांबरे, जंगमहट्टी व घटप्रभा हे तिन्ही मध्यम प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले असून प्रचंड पाणी विसर्गामुळे नद्यांना पूर आला आहे. परिणामी अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


जांबरे प्रकल्पाची पाणीपातळी ७३७ मी.वर पोहोचली. २३.२३ द.ल.घ.मी. (१००%) साठा झाला आहे. मागील २४ तासांत १३७ मि.मी. पाऊस झाला. सांडवा विसर्ग १५१४ क्युसेक, विद्युतगृहातून २४० क्युसेक पाणी सोडले जात आहे. परिणामी कोकरे चंदगड, कुरतनवाडी व हल्लारवाडी येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.



जंगमहट्टी प्रकल्पाची पाणीपातळी ७२६.३५ मी. इतकी झाली असून ३४.६५ द.ल.घ.मी. (१००%) साठा झाला आहे. मागील २४ तासांत ७३ मि.मी. पावसाची नोंद. सांडवा विसर्ग ६३४ क्युसेक असून कोवाड (ताम्रपर्णी नदी) येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे.


घटप्रभा प्रकल्पाची पातळी ७४२.३५ मी. झाली असून एकूण साठा ४४.१७२ द.ल.घ.मी. (१००%) आहे. २४ तासांत तब्बल २२० मि.मी. पाऊस झाला. सांडवा विसर्ग ५५८० क्युसेक, विद्युतगृह विसर्ग ८०० क्युसेक. घटप्रभा नदीवरील पिळणी, तारेवाडी, हिंडगाव, बिजुर-भोगली, कानडी-सावर्डे, अडकूर व कानडेवाडी हे सातही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.


स्थिती गंभीर पण नियंत्रणात:

मौजे कोवाड येथे जुन्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. मात्र बाजारपेठेत पूरपाणी प्रवेश केलेले नाही. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे.


शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होण्याची भीती असली तरी पाणी साठ्यांच्या दृष्टीने ही स्थिती समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments