चंदगड/प्रतिनिधी : समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वंचित, बहुजन, इतर मागास व गोरगरिबांसाठी असंख्य सोयीसुविधा व योजना असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन परिस्थितीला व गरिबीला दोष न देता उज्वल करिअर घडवावे असे आवाहन समाज कल्याण विभागाचे निरीक्षक सचिन परब यांनी केले.ते चंदगड येथील र.भा माडखोलकर महाविद्यालयांमध्ये समान संधी कक्ष आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.डी. गोरल होते.
सचिन परब आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, समाजकल्याण विभागाच्या वतीने बार्टी,अमृत, सारथी, महाज्योती आर्टि, टी.आर टी आय, या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक कल्याणकारी योजना कार्यरत आहेत, या सर्व योजनांची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेणे गरजेचे आहे, परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही त्यांना या योजनेच्या माध्यमातून आपल्याला असंख्य संधी असून जिद्दीने विद्यार्थ्यांनी क्लास वन ऑफिसर होण्यासाठी प्रयत्नरत राहावेत, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आजरा गडहिंग्लज चंदगड विभाग हे गुणवंतांची खाण म्हणून ओळखली जाते, परंतु शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे अनेक होतकरू गरजू व प्रामाणिक विद्यार्थी यापासून लांब राहतात यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक योजनांची माहिती घ्यावी व इतरांनाही सांगावी जेणेकरून शासनाचा उद्देश सफल होईल असे सांगून त्यांनी अतिशय सोप्या भाषेत शासकीय योजनांची माहिती प्रभावी सांगून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध व प्रोत्साहित केले. त्याचबरोबर यापूर्वी या योजनांचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची सचित्र माहिती ही विद्यार्थ्यांना त्यांनी करून दिली त्यामुळे विद्यार्थ्यांतून अतिशय समाधान व्यक्त होत होते.
प्रास्ताविक समान संधी कक्षाचे समन्वयक डॉ. टी.ए.कांबळे यांनी करून या योजनांची सविस्तर माहिती सांगून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल म्हणाले की, आपल्या महाविद्यालयामध्ये खेड्यापाड्यातील व गोरगरीब विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने शासनाच्या या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे यासाठी विद्यार्थ्यांनी शोधक दृष्टिकोन ठेवून परिपूर्ण माहिती मिळवून आपले करिअर उज्वल करावे असे आवाहन केले. यावेळी डॉ टी. ए.कांबळे यांनी लिहिलेल्या मानव मुक्तीच्या चळवळीतील महायोद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक प्रमुख पाहुणे सचिन परब यांना देण्यात आले यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मान. सचिन परब यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉ. गोरल यांच्याहस्ते करण्यात आला.सूत्रसंचालन डॉ. एन के पाटील यांनी केले. तर आभार विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गावडे यांनी मानले.या कार्यक्रमाला डॉ. एम एम माने,डॉ. जीवाय कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, अनिल पाटील यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments