चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ आयोजित आणि माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या पुढाकारातून नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय काव्यगायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. जिल्ह्यातील तब्बल १३३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या सुरेल आवाजाने आणि काव्यगायनातून रसिकांचे मन जिंकले. कवितेतील भाव, स्वरांची लय व रसिकांच्या अंतःकरणाला भिडलेली अनुभूती या स्पर्धेत प्रकर्षाने जाणवली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. हर्षिता संग्राम निकम (पा. बा. पाटील हायस्कूल, मुदाळ – भुदरगड) हिने कुसुमाग्रजांच्या “अनामवीरा” या कवितेच्या सादरीकरणाने पटकावला. द्वितीय क्रमांक कु. देवयानी तानाजी पाटील (राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक – चंदगड) हिने संत जनाबाईंचे “धरीला पंढरीचा चोर” गायन करून मिळवला. तृतीय क्रमांक कु. कीर्ती सदाशिव आवटे (राजर्षी शाहू हायस्कूल, कोल्हापूर) हिच्या संत तुकडोजी महाराजांच्या “या झोपडीत माझ्या” या रचनासाठी जाहीर करण्यात आला.
चतुर्थ क्रमांक कु. जानवी निवास पाटील (वि. स. खांडेकर प्रशाला, कोल्हापूर – “गर्जा महाराष्ट्र माझा” राजा बढे) तर पाचवा क्रमांक कु. पुर्वा श्रीकांत वाघे (हेरवाड हायस्कूल, शिरोळ – “वनवासी” तुकाराम धांडे) यांनी पटकावला.याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके कु. स्वराली राजेंद्र जोंगे (तुरुकवाडी), कु. श्रेणिक सर्जेराव सुतार (वाशी, करवीर), सिद्धीका मुजीबूर रेहमान मुल्लानी (पट्टणकोडोली, हातकणंगले) व कु. आराध्या संदीप मोरे (जरगनगर, कोल्हापूर) या विद्यार्थ्यांना देण्यात आली.या काव्यगायन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गायनातून व्यक्त केलेल्या भावना आणि सादरीकरणातील ताकदीने जिल्हा नव्हे तर संपूर्ण मराठी साहित्यविश्व भारावून गेले. विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments