चंदगड (प्रतिनिधी): कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध वकिल भारती गावडे–पाटील (सौ. सुजाता गुंडुराव कांबळे) यांच्या सत्यशोधक लीगल असोसिएट ऑफिसला नुकतीच कोल्हापूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक न्यायासाठीच्या समर्पित कार्याची आणि जनतेच्या न्यायप्राप्तीसाठीच्या अथक प्रयत्नांची मनापासून प्रशंसा केली. या प्रसंगी सहाय्यक फौजदार व आंतरराष्ट्रीय धावपटू नरसिंगराव कांबळे, साहेब फौजदार पैलवान पाटील, पोलीस अंमलदार दत्तात्रय दुबुले, पोलीस हवालदार (वाहतूक शाखा) राजू नाईक, तसेच पोलीस अंमलदार अमित सुळगावकर हे प्रमुख उपस्थित होते. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऍड.भारती गावडे–पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहाय्यक फौजदार व आंतरराष्ट्रीय धावपटू नरसिंगराव कांबळे यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की,“ऍड.भारती गावडे–पाटील यांनी समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी जे कार्य हाती घेतले आहे ते खरोखरच प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे चंदगडसारख्या ग्रामीण भागातून येऊन कोल्हापूरसारख्या ऐतिहासिक शहरात कायद्याच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या कार्यातून ग्रामीण जनतेसाठी नवा आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.”
सत्यशोधक लीगल असोसिएट ऑफिस हे कोल्हापूर शहरातील अग्रगण्य कायदेशीर मार्गदर्शन केंद्र असून, येथे फॅमिली मॅटर, चेक बॉन्स प्रकरणे, बँकिंग विषयक वाद, महिलांचे हक्क, तसेच दलित-वंचित घटकांचे प्रश्न अशा विविध प्रकरणांमध्ये न्यायसाहाय्य व सल्ला दिला जातो.समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने हे कार्यालय कार्यरत असून, अल्पावधीतच समाजात विश्वास, प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळवण्यात यशस्वी ठरले आहे.
या भेटीदरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ऍड.भारती गावडे–पाटील या कायद्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी व्यक्ती आहेत. त्यांचे कार्य न्याय, संवेदनशीलता आणि समतेचा नवा आदर्श निर्माण करते.” ऍड. भारती गावडे–पाटील यांनी या भेटीदरम्यान पोलीस दलाचे आभार मानत म्हटले की, “कायदा आणि पोलीस हे न्यायव्यवस्थेचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. परस्पर सहकार्य, जनजागृती आणि सामाजिक संवेदनशीलतेतूनच न्यायसंपन्न समाज उभारता येतो.”भेटीदरम्यान स्नेहपूर्ण वातावरणात महिला सक्षमीकरण, कायदेविषयक जनजागृती, सामाजिक जबाबदारी आणि पारदर्शक न्यायव्यवस्थेवर प्रेरणादायी संवाद झाला.
Post a Comment
0 Comments