चंदगड/प्रतिनिधी : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील सुकन्या वृषाली पाटील हिची सामाजिक न्याय विभागामध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे समाजकल्याण निरीक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी नांदवडे गावचे सरपंच राजेंद्रकुमार कांबळे यांनी वृषाली पाटील ही ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरल्याचे सांगितले.
सरपंच अनंत कांबळे यांनी वृषालीच्या यशामागे तिचा सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्द महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.संदीप यादव यांनी सांगितले की, “वृषालीचे यश हे फक्त तिचे नसून संपूर्ण बहुजन समाजाचे अभिमानाचे यश आहे. अशा तरुणांनी समाजाला दिशा देण्याची जबाबदारी स्वीकारावी आणि इतरांनीही तिच्या पावलावर पाऊल ठेवावे,” असे आवाहन त्यांनी केले.
भिकाजीराव कांबळे -भोगोलिकर यांनीही वृषाली पाटीलच्या यशाचे कौतुक करत म्हटले की, “वृषालीचे यश प्रत्येक ग्रामीण मुलीला स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देते. समाजात प्रगती आणि समानतेसाठी अशा तरुणांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी तिच्या प्रयत्नांचे कौतुक करावे आणि पुढच्या पिढीसाठी उदाहरण निर्माण करावे.
बहुजन क्रांती सामाजिक संघटना ही समाजातील वंचित, शोषित, दलित, कष्टकरी व सर्व बलुतेदार लोकांना संघटित करून अविरतपणे काम करणारी संस्था आहे. अल्पावधीतच संघटनेने आपले नावलौकिक निर्माण केले असून, अशा कार्यक्रमांद्वारे समाजातील युवक-युवतींना प्रेरणा देण्याचा तिचा उद्देश स्पष्ट होतो.
या कार्यक्रमाला उपस्थित होते नांदवडे गावचे सरपंच राजेंद्रकुमार कांबळे, कोरज कुरतनवाडी गंधर्वगड येथील सरपंच अनंत कांबळे, शिरगावचे माजी सरपंच राजू कांबळे, संघटनेचे कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे (भौगोलिकर), संदीप यादव, संतोष कांबळे, संस्था अध्यक्ष प्रा. डॉ. गुंडूराव कांबळे आणि बहुजन संघटक पी. डी. सरोदे, यांच्यासह बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्तेही आवर्जून उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments