Type Here to Get Search Results !

ॲडविक कंपनीची देहू येथील वात्सल्य मतिमंद मुलांसोबत “आनंदाची दिवाळी” साजरी



(मुलांना फराळ, मिठाई, कपडे व किराणा साहित्याचे वाटप-चेहऱ्यावर उमटला आनंद,सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण-कंपनीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक)


पुणे/प्रतिनिधी : सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या ॲडविक कंपनी, चाकण यांनी या वर्षी दिवाळीचा आनंद समाजातील विशेष बालकांसोबत वाटण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. “आनंदाची दिवाळी” या भावनिक उपक्रमांतर्गत कंपनीतर्फे देहू गाव येथील वात्सल्य मतिमंद मुलांच्या शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली.


दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी कंपनीकडून दिवाळी फराळ, मिठाई, कपडे तसेच किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तू स्वीकारताना ५५ मतिमंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकलेले हसू हा कार्यक्रमाचा सर्वात भावनिक क्षण ठरला.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या आकर्षक पणत्यांचे प्रदर्शनही लावले होते. त्यांच्या कलाकृतींना उपस्थित मान्यवरांनी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मनापासून दाद दिली.




याप्रसंगी भूषण बदगुजर, सचिन मंहिंद, अजय भोर, प्रभाकर कुलकर्णी, अमोल हुब्बे, प्रसाद साकोरे आदी उपस्थित होते. सर्वांनीच या निरागस मुलांसोबत वेळ घालवत “ही दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरली” अशी भावना व्यक्त केली.कंपनीने आपली दिवाळी सामाजिक संवेदनेने साजरी करण्याचा जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे स्थानिक समाजात आणि औद्योगिक क्षेत्रातही व्यापक कौतुक होत आहे. हा उपक्रम फक्त एक सण साजरा करण्यापुरता न राहता, समाजातील दुर्बल घटकांबद्दलची कृतिशील सहानुभूती व्यक्त करणारा ठरला आहे.निवेदन प्रमोद चांदेकर यांनी तर आभार तृप्ती बेंढाले यांनी मानले

Post a Comment

0 Comments