Type Here to Get Search Results !

चंदगड तालुक्यातील पार्लेतील शेतकरी अस्वल हल्ल्यात गंभीर जखमी


चंदगड/प्रतिनिधी- चंदगड तालुक्यातील पार्ले येथे पुन्हा एकदा वन्यप्राण्यांचा धुमाकूळ दिसून आला आहे.शनिवारी दुपारी गावशेजारील जंगलात जनावरे चारावयास गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने जबर हल्ला केला आहे. ७५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी असून वन विभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे त्यांना वेळेत उपचार मिळाले आहेत.


शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी चंदगड तालुक्यातील पार्ले  येथील श्री खाचू बाळू कांबळे (वय ७५) हे जनावरे चारण्यासाठी पार्ले मालकी गट क्र. ३६४ मधील गुरवाच्या तळ्या जवळ गेले होते.दुपारच्या सुमारास अचानक जंगलातून बाहेर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने त्यांच्या उजव्या दंडावर चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले.गावकऱ्यांनी तत्काळ आरडाओरड करून वन विभागाला माहिती दिली.क्षणाचाही विलंब न लावता पाटणे वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल धामणकर,वनरक्षक पार्ले व पाटणे, वनसेवक, तसेच वाहनचालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी कांबळे यांना तातडीने वाहनातून ग्रामीण रुग्णालय,चंदगड येथे दाखल केले.तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हाताचे हाड फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना गडहिंग्लज येथील हत्तरकी हॉस्पिटल येथे नेण्यात आले.त्यांच्या दंडावर शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्यात आली, अशी माहिती वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी दिली.


या कारवाईत हत्ती हाकारणी टीम, पार्लेचे सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले.गावकऱ्यांनीही चांगले सहकार्य करत जखमी शेतकऱ्याला वेळेत मदत केली.वन विभागाच्या तत्पर प्रतिसादामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.सदर घटनेनंतर संपूर्ण पार्ले परिसरात भीतीचे वातावरण आहे, तर वन विभागाकडून हल्लाग्रस्त भागात गस्त वाढविण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून चंदगड तालुक्यात हत्ती, गवा, बिबट्या आणि आता अस्वलांचे हल्ले वाढत आहेत.


शेतकऱ्यांच्या जीवितासह पिकांचेही मोठे नुकसान होत असून ग्रामस्थांनी वन्यप्राणी प्रतिबंधक उपाययोजना वाढविण्याची मागणी केली आहे.वन विभागाच्या कर्मचारी वर्गाने दाखवलेली वेगवान कारवाई आणि जबाबदारीची जाणीव खरंच कौतुकास्पद आहे.मात्र, अशा घटना थांबवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि ग्रामीण भागात जनजागृती गरजेची आहे.


Post a Comment

0 Comments